

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने महाराष्ट्र शासन व विविध उद्योग व्यावसायिक संस्थांबरोबर ९ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. २७ जून रोजी कुलगुरु प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सल्लागार परिषदेचे अध्यक्ष अशोक जैन होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी कुलगुरु प्रा. डॉ. आर.एस. माळी, प्रा. डॉ. के.बी. पाटील, AEDP महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. भरत अमळकर, प्र-कुलगुरु प्रा. एस.टी. इंगळे आणि कुलसचिव डॉ. विनोद पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
या करारांतर्गत बी.कॉम रिटेल मॅनेजमेंट, बीएससी अप्लाइड बायोलॉजी, बीए ह्युमेनिटीज अँड सिव्हिल सर्व्हिसेस हे तीन अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम, एम.ए. ट्रायबल अकॅडमी आणि पी.जी. डिप्लोमा इन एनजीओ मॅनेजमेंट हे अभ्यासक्रम सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली.
कुलगुरु प्रा. माहेश्वरी यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेतानाच रोजगाराच्या संधी मिळतील. उद्योग क्षेत्राचा उत्तम प्रतिसाद लाभल्याचे त्यांनी नमूद केले. माजी कुलगुरु प्रा. माळी यांनी या अभ्यासक्रमांमुळे उच्च शिक्षणात विद्यार्थी सहभाग वाढेल, असा विश्वास व्यक्त केला. प्रा. के.बी. पाटील यांनी या नविन अभ्यासक्रमांनी विद्यार्थ्यांना उत्तम संधी उपलब्ध होतील, असे मत मांडले. अनिकेत पाटील (जळगाव पिपल्स बँक) यांनी अभ्यासक्रम संस्था व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असल्याचे सांगितले.
अशोक जैन यांनी अध्यक्षीय समारोप करताना सांगितले की, अवघ्या तीन महिन्यांत संवाद साधून अभ्यासक्रम विकसित करणे व अंमलबजावणी करणे कौतुकास्पद आहे. त्यांनी केळीच्या टिश्यू कल्चरवर आधारित अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला व पूर्ण सहकार्याची हमी दिली.
प्रारंभी करारावर स्वाक्षऱ्या कुलसचिव डॉ. विनोद पाटील व नवजीवन प्लस सुपर शॉपचे संचालक अनिल कांकरीया यांनी केल्या. करार हस्तांतरणासाठी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, जैन इरिगेशनचे श्री. भट व डॉ. के.बी. पाटील, नॅचरुली युवर्स बायोटेकचे निलेश तेली, दीपक मेडिकलचे दीपक पाटील, BOAT मुंबईचे प्रदीप थेंगडे, बीआयएएफच्या पूनम पाटील यांची उपस्थिती होती. डॉ. राजेश जवळेकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. विनोद पाटील यांनी आभार मानले. विद्यापीठाचे विविध परिषद सदस्य, अधिकारी, शिक्षक आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.