

जळगाव : जिल्ह्यात यावर्षी बदलत्या हवामानामुळे नागरिकांसह शेतीलाही फटका बसत आहे. एप्रिल महिन्यात तापमान 44 ते 45 अंशांपर्यंत पोहोचले होते. तर मे महिन्याच्या सुरुवातीलाच वादळी वारे, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे वातावरणात अचानक बदल झाला. अशा स्थितीत 1 मे ते 10 मे या कालावधीत हतनूर धरणात 3.63 दलघमी बाष्पीभवन नोंदवले गेले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 0.19 दलघमीने बाष्पीभवनात वाढ झाली आहे.
2024 मध्ये याच कालावधीत 3.44 दलघमी बाष्पीभवन झाले होते. गेल्या वर्षी 2 मे 2024 रोजी 0.43 दलघमी, तर 2 मे 2025 रोजी 0.47 दलघमी बाष्पीभवन झाले. त्यामुळे यावर्षी 0.04 दलघमीने बाष्पीभवनात वाढ झाल्याचे निरीक्षण आहे.
हतनूर धरणाचा सध्या जलसाठा मागील वर्षीच्या तुलनेत 1.31 टक्क्यांनी कमी आहे. पाण्याची एकूण पातळी 0.075 दलघमीने घटली असून, जिवंत साठ्यात 3.5 दलघमीने घट नोंदली गेली आहे. 10 मे रोजी जलसाठा 1.81 टक्क्यांनी कमी असल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले.
अतुल धरणातून यावर्षी चार आवर्तन सोडण्यात आली आहेत, जी गेल्या वर्षासारखीच आहेत. मात्र बिगर सिंचनासाठी 2024 मध्ये पाच आवर्तने झाली होती, तर 2025 मध्ये आठ आवर्तने करण्यात आली आहेत. यातील तीन आवर्तने केवळ बिगर सिंचनासाठीच होती. दि. 10 मे रोजी सायंकाळी चार वाजता आणखी एक आवर्तन पिण्याच्या पाण्यासह औद्योगिक वापरासाठी सोडण्यात येणार आहे. हतनूर धरणाचे सहाय्यक अभियंता भावेश चौधरी यांनी सांगितले की, "यावर्षी 2 मे रोजी सर्वाधिक बाष्पीभवन झाले आहे."