

जळगाव : भुसावळ शहरातील डी.एस. हायस्कूल आणि क्रीडांगण परिसरातील अनेक वर्षांचे अतिक्रमण अखेर हटवण्यात आले आहे. रस्ते मोकळे झाले आणि परिसर स्वच्छ झाला. हे काम स्थानिक प्रशासनाने नियमित कारवाई म्हणून केले नाही, तर मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभेसाठी होणाऱ्या हेलिकॉप्टर लँडिंगच्या तयारीमुळे कारवाई प्रभावी ठरली.
डीएस ग्राउंडची अवस्था अनेक वर्षांपासून खराब होती. आजूबाजूच्या रस्त्यांवर भाजीपाला विक्रेते आणि इतर व्यावसायिकांचे अतिक्रमण होते. पडझड झालेला बस स्थानकाचा थांबाही तसेच होता. सोमवार (दि.24) रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा असल्याने त्यांचे हेलिकॉप्टर या ठिकाणी उतरणार असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी स्वतः मैदानावर उतरले आणि संपूर्ण प्रांगण स्वच्छ करून लेव्हल करण्यात आले. मैदानावर पाणी मारून ते क्रीडांगणासारखे दिसू लागले. मुख्यमंत्र्यांची रॅली ज्या मार्गाने जाणार आहे, त्या रस्त्याचीही मोठ्या प्रमाणावर साफसफाई करण्यात आली, तर सफाई कामगार सकाळपासून कचरा उचलण्यावर भर देत आहेत.
वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेले काम एका रात्रीत पूर्ण झाल्याने नागरिकांमध्ये चर्चा होत आहे की, नियमित स्वच्छता आणि अतिक्रमणावर कारवाई हवी असेल, तर मुख्यमंत्र्यांनी दोन महिन्यांतून एकदा तरी भुसावळला यायला हवे.
जनतेच्या सोयीपेक्षा व्हीआयपी दौऱ्याला प्राधान्य देणारी प्रशासनाची ही पद्धत लोकांना खटकत आहे. आता शहरातील स्वच्छता आणि सुव्यवस्था मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही तरी टिकणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.