Pachora Crime : दरमहा 20 हजाराच्या पोटगीचा सूड उगवण्यासाठी 2 लाखांची सुपारी, पतीने पेटवले पत्नीचे घर

पाचोरा जाळपोळ प्रकरणाचा एलसीबीकडून पर्दाफाश; मुख्य सूत्रधार पतीसह साथीदार गजाआड, ९ चोरीच्या मोटारसायकलीही हस्तगत
Crime News
Crime News Pudhari
Published on
Updated on

जळगाव : पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे एका महिलेच्या घरावर भररात्री पेट्रोल टाकून आग लावल्याच्या अत्यंत गंभीर आणि दहशतीचा थरार निर्माण करणाऱ्या घटनेचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. पोटगीच्या वादातून संतापलेल्या पतीने चक्क २ लाख रुपयांची सुपारी देऊन आपल्याच पत्नीचे घर पेटवल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या कारवाईत एलसीबीने मुख्य सूत्रधार पतीसह दोन आरोपींना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून ९ चोरीच्या मोटारसायकली जप्त करून आंतरजिल्हा वाहनचोरीचे मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे.

नेमका प्रकार काय?

नगरदेवळा येथील रहिवासी किरण उमेश राऊळ आणि त्यांची आई घरात गाढ झोपेत असताना, तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी घराच्या मुख्य दरवाजावर पेट्रोल ओतून आग लावली होती. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२६ (c) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी एलसीबीला तपासाचे आदेश दिले होते.

पोटगीचा राग आणि २ लाखांची सुपारी

तपासादरम्यान एलसीबीच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित गणेश बाबुराव पाटील (रा. कळमसरा) याला ताब्यात घेतले. त्याने दिलेली कबुली ऐकून पोलीसही चक्रावून गेले. फिर्यादी महिला आणि तिचा पती राहुल वसंतसिंग पाटील (रा. जामनेर) यांच्यात न्यायालयात वाद सुरू होता. न्यायालयाने राहुलला दरमहा २०,००० रुपये 'खावटी' (पोटगी) देण्याचे आदेश दिले होते. हाच राग मनात धरून राहुलने आपल्या पत्नीचा काटा काढण्यासाठी गणेश पाटील आणि समाधान निकम यांना २ लाखांची सुपारी दिली होती. त्यापैकी १ लाख रुपये 'ॲडव्हान्स' देऊन त्याने हे जाळपोळीचे कृत्य घडवून आणले.

तपासात चोऱ्यांचा 'बोनस'

मुख्य आरोपी गणेश पाटील याच्या सखोल चौकशीतून तो केवळ गुन्हेगारच नाही, तर अट्टल वाहनचोर असल्याचे उघड झाले. त्याच्याकडून जळगाव (पाचोरा, एमआयडीसी, बोदवड), जालना (भोकरदन), संभाजीनगर आणि अगदी गुजरात राज्यातील सुरत येथून चोरलेल्या एकूण ९ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. यामुळे वाहनचोरीचे अनेक गुन्हे एकाच वेळी उघडकीस आले आहेत. ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पीएसआय शेखर डोमाळे आणि त्यांच्या पथकातील अंमलदार लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, हेमंत पाटील, मिलिंद जाधव व सहकाऱ्यांनी केली आहे. अटकेतील आरोपींना पुढील तपासासाठी पाचोरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news