

जळगाव : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून उन्हाच्या झळा सुरु झाल्या होत्या तर एप्रिल महिनाअखेर जळगाव जिल्ह्यात उन्हाचा कहर जाणवत आहे. मंगळवार (29 एप्रिल) रोजी जिल्ह्यातील कमाल तापमान 43.1 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. उष्णतेच्या लाटेमुळे वातावरणात गरम वारे जाणवत असून उन्हाचा चटका बसत आहे. नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
राज्यातील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावमध्ये यंदा एप्रिल महिन्यातच 44 ते 45 अंश तापमानाची नोंद झाली आहे. मे महिन्यात 47 अंशांपर्यंत तापमान गेलेली नोंद पूर्वी झाली असून यंदा ही तीव्रता एप्रिलमध्येच जाणवू लागली आहे.
दरम्यान, मुंबई हवामान विभागाने 30 एप्रिलसाठी जळगावसह जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, वर्धा, चंद्रपूर आणि नागपूर या आठ जिल्ह्यांसाठी ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. तसेच 1 मे रोजी जळगावसह संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया या 11 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार नागरिकांनी शक्यतो दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि उष्णतेपासून बचाव करण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरु करण्यात आला असून रुग्णांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा रुग्णालयाकडून करण्यात आलेले आहे.