

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठ्या धरणांमध्ये हातनुर धरणाचा समावेश होतो. हे धरण तापी व पूर्णा नदीच्या संगमावर बांधण्यात आलेले आहे. या धरणात आजच्या स्थितीला 54 टक्के गाळ साचलेला आहे. असे असताना धरणात 91 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे तर अजून उन्हाळ्याचे चार महिने येणे शिल्लक आहे.
जळगाव जिल्ह्यामधील हातनुर धरण हे सर्वात मोठे धरण आहे. या धरणावर जळगाव जिल्ह्यातील औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ व वरणगाव तसेच रेल्वे नगरपालिका भुसावळ, यावल त्याचबरोबर इतर नगरपालिका तसेच सिंचनाचा भाग या धरणावर अवलंबून आहे. हातनुर धरण निर्मितीपासून गाळाचा प्रश्न कायम राहिल्याने आज या धरणात 54 टक्के झाल्याचे मेरी संस्थेने नोंदविले आहे.
या धरणातून आतापर्यंत बिगर सिंचनासाठी तापी नदीच्या पात्रामध्ये एक आवर्तन सोडण्यात आलेला आहे. तर सिंचनासाठी कालव्याच्या माध्यमातून दोन आवर्तने सोडण्यात आलेली आहे. आजच्या स्थितीला हातनुर धरणामध्ये धरणाची लेव्हल 213.650 मीटर आहे. तर धरणातील साठा 367 दलघमी तर जिवंत साठा 234 दलघमी आहे.
असे असताना धरणामध्ये जास्त गाळ साचला गेल्यामुळे धरणातील पाणी भविष्यात किती साठवले जाईल हा प्रश्न उपस्थित होत आहे. आज या धरणाच्या व गाळाच्या प्रश्नासाठी गेल्या 23 वर्षांपासून आठ दरवाजांची निर्मितीचे काम सुरू आहे. मात्र ते अजूनही पूर्ण झालेले नाही त्यामुळे पूर्णा नदी मधून येणारा गाळ हा असाच येत राहिल्यास या गाळाची टक्केवारी दिवसेंदिवस वाढतच राहणार आहे.
आज भुसावळ शहराला तापी नदी असूनही 12 ते 13 दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. हे सर्वात मोठे दुर्भाग्य आहे. आज धरणामध्ये 91 टक्के साठा जरी असला तरी जळगाव जिल्ह्यातील उन्हाळा हा खूप मोठ्या प्रमाणात तीव्र असतो. यामध्ये धरणातील पाण्याच्या मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असते. जळगाव जिल्ह्याचा पारा हा 45 अंशापर्यंत जात असल्याने व त्यापेक्षाही अधिक जात असल्याने पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होते. ती एक चिंतेची बाब आहे.