

जळगाव : हतनुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पर्जन्यमानामुळे धरणातील पाणीपातळी वाढली आहे. धरणाचे 41 पैकी 14 दरवाजे प्रत्येकी 1 मीटरने उघडण्यात आले असून, तापी नदीपात्रात सध्या 28 हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे.
पुढील काही तासांत हा विसर्ग 50 ते 75 हजार क्युसेकपर्यंत वाढण्याची शक्यता असल्याने तापी व पूर्णा नदीच्या काठावरील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासन, जळगाव यांनी केले आहे.
गेल्या 24 तासांत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात एकूण 292.4 मि.मी. पाऊस झाला असून, सरासरी 32.5 मि.मी. इतकी नोंद झाली आहे. यामध्ये गोपालखेडा (79.6 मि.मी.), लखपुरी (56.8 मि.मी.), अकोला (55.4 मि.मी.), एरडी (21.4 मि.मी.), देढतलाई (29.8 मि.मी.) आदी केंद्रांवर पावसाची सर्वाधिक नोंद झाली आहे. नदीकाठच्या रहिवाशांना धरण जिल्हा प्रशासनाने सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.