Gulabrao Patil Davos remark | पुढच्या वेळी मी पण 'कोट' घालून दावोसला जाईन, तेव्हाच उद्योग मिळतील का?

कोकाकोला जामनेरला, तर प्रकल्प चाळीसगावला; गुलाबरावांचा स्वकियांनाच 'घरचा आहेर'
Gulabrao Patil Davos remark | पुढच्या वेळी मी पण 'कोट' घालून दावोसला जाईन, तेव्हाच उद्योग मिळतील का?
Published on
Updated on

जळगाव : "जळगाव जिल्ह्यात येणारा 'कोकाकोला'चा प्रकल्प जामनेरला गेला, आता १५ हजार कोटींचा प्रकल्प चाळीसगावला गेला. मग आम्ही काय फक्त बघत राहायचं का? आपण आमदार आहोत की नाही? भानगड केल्याशिवाय काहीच मिळत नाही. बहुतेक पुढच्या वेळी मलाही 'कोट' घालून दावोसला जावे लागेल, तेव्हाच माझ्या वाट्याला काही मिळेल," अशा शालजोडीतील शब्दांत राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वपक्षाचे आमदार मंगेश चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांना जोरदार टोला लगावला.

एका बाजूला स्वकियांना चिमटे काढतानाच, "छोट्या उद्योजकांना त्रास द्याल तर बँकांशी थेट दुश्मनी घेईल," असा सज्जड दमही त्यांनी बँक अधिकाऱ्यांना भर कार्यक्रमात दिला. जळगाव जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने आयोजित कार्यशाळेत ना. पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावरून फटकेबाजी करताना त्यांनी जिल्हअंतर्गत पळवल्या जाणाऱ्या उद्योगांवरून अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली.

'दावोस'वरून मंगेश चव्हाणांना टोला?

चाळीसगावसाठी १५ हजार कोटींचा प्रकल्प आणण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण दावोसला गेले होते. यावर नाव न घेता भाष्य करताना गुलाबराव म्हणाले, "जामनेरला उद्योग आले, चाळीसगावला आले. आपण दावोसमध्ये गेलो असतो, तर आपल्यालाही काही मिळाले असते. आता पुढच्या वेळी मी पण दौरा काढतो आणि कोट घालून जातो." पालकमंत्र्यांच्या या 'मिश्किल' वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला असला, तरी त्यातील राजकीय 'नाराजी' लपून राहिली नाही.

बँकवाल्यांनो, सुधरा

बँकांकडून छोट्या उद्योजकांना होणाऱ्या त्रासावर बोट ठेवताना गुलाबराव आक्रमक झाले. "बँकांशी माझी कोणतीही दुश्मनी नाही आणि त्यांच्यावर टीका करण्याची माझी इच्छाही नाही. पण, छोट्या उद्योजकांना विनाकारण त्रास देण्याची काही बँकांची खोड आहे. ती त्यांनी वेळीच थांबवावी. त्यांची इच्छाच असेल, तर मला बँकांसोबत दुश्मनी करावी लागेल. आणि गुलाबराव पाटील काय चीज आहे, हे त्यांना कळेल," अशा शब्दांत त्यांनी बँक प्रशासनाला ताकीद दिली.

देसाईंकडे बघून बोललो, 'आम्ही दुसऱ्याची लेकरं आहोत का?'

जळगाव एमआयडीसीला 'डी प्लस' दर्जा मिळवतानाच्या आठवणी सांगताना त्यांनी तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर निशाणा साधला. "आम्ही ११-११ आमदार निवडून दिले, सरकार आमच्यामुळे बसले आणि आम्हालाच लांब ठेवले जात होते. देसाई साहेब तर आमच्याकडे बघायचे सुद्धा नाहीत. शेवटी एका बैठकीत मी त्यांना सुनावले, 'आम्ही काय दुसऱ्याची लेकरं आहोत का?'. त्यानंतर खूप 'भनका-भनकी' झाली आणि शेवटी जळगावला न्याय मिळाला," असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला.

माझी 'इंडस्ट्री' जोरात सुरू आहे

आपल्या राजकीय कारकिर्दीवर मिश्किल टिप्पणी करताना ते म्हणाले, "मी ३ वर्षे परभणीचा आणि आता ७ वर्षांपासून जळगावचा पालकमंत्री आहे. १० वर्षे पालकमंत्री राहणे सोपे नाही, पण तुमची कृपा आहे. सध्या आमची इंडस्ट्री (राजकारण) पण जोरात सुरू आहे. आम्ही आमच्या धंद्यात (राजकारणात) श्रेष्ठ आहोत, तसे तुम्ही उद्योगात नैपुण्य मिळवा," असा सल्लाही त्यांनी तरुणांना दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news