

शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पक्षाच्या भविष्यातील वाटचालीसह शिवसेना फुटीबाबत मोठे वक्तव्य केले. एका विशेष मुलाखतीत बोलताना त्यांनी पक्ष फुटीमागे संजय राऊत यांच्यासोबतच आदित्य ठाकरे यांनाही जबाबदार धरले.
"बाळासाहेब ठाकरे यांनी उभे केलेले वैभव आणि शिवसेनेचा किल्ला जपण्याचे काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. चार अक्षरांनी उभी राहिलेली शिवसेना अबाधित ठेवण्याचे कार्य ते करत आहेत," असे पाटील म्हणाले.
पक्ष सोडून गेलेले खासदार पुन्हा शिवसेनेत येतील का, याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार एकनाथ शिंदे यांचाच असल्याचे सांगत, "ते जो निर्णय घेतील, त्याला सर्वांची मान्यता असेल," असे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना फुटीची कारणे सांगताना पाटील म्हणाले, "लोकप्रतिनिधींना अपेक्षित महत्त्व दिले जात नव्हते. आमदारांच्या भावना आणि अडचणी वरिष्ठांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचत नव्हत्या."
आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी म्हटले, "आम्ही आदित्य ठाकरे यांना राजकुमार समजत होतो. उद्धव ठाकरे आजारी असताना ते मंत्री होते. त्यांनी आमदारांच्या समस्या जाणून घेतल्या असत्या, त्यावर मार्ग काढला असता आणि त्या भावना पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवल्या असत्या, तर कदाचित ती परिस्थिती निर्माण झाली नसती."
संजय राऊत यांच्यावरही त्यांनी टीका केली. "त्यांच्या बोलण्यात आजही तारतम्य नाही. आमदार, नगरसेवक आणि इतर पदाधिकारी पक्ष सोडून जात असताना केवळ आक्रमक वक्तव्य करून प्रश्न सुटत नाहीत," असे ते म्हणाले."रक्ताचे पाणी करून भगवा जिवंत ठेवणारी माणसे पक्षातून गेली. सोने परत मिळू शकते, पण अशी माणसे परत मिळत नाहीत," अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करताना पाटील म्हणाले, "शिवसेना कायम राहील, भगवा तेवत राहील आणि बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आमच्यासोबत असतील." उद्धव ठाकरे भविष्यात शिवसेनेत येतील का, या प्रश्नावर मात्र त्यांनी सावध भूमिका घेत, "यावर बोलण्याइतका मी मोठा नाही," असे उत्तर दिले.