

जळगाव | जळगाव ग्रामीण मतदारसंघात विधानसभा निवडणूकीत पराभूत झालेले शरद पवार गटाचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी निवडणूक होताच आपण राष्ट्रवादी (अजित पवार गटात) जाण्याची जाहीर घोषणा केली होती. मात्र, गुलाबरावांना पक्षात घेण्यास पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा विरोध झाल्यानंतर अजित पवारांनी त्यांच्या प्रवेशाला नकार दिल्याचे खात्रीलायक वृत्त मिळाले आहे. तर दुसरीकडे, जेलमध्ये जाण्याची वारी टाळण्यासाठी ते सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्याच्या हालचाली करत असल्याची टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदार संघामधून शरद पवार गटाकडून गुलाबराव देवकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते. शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी त्यांचा पराभव केला. पराभवानंतर देवकर व त्यांचे कार्यकर्त्यांनी अजित पवार गटात जाण्याबाबत निर्णय घेतला. त्यानुसार अजित पवार यांच्याशी चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली. मात्र जळगाव ग्रामीण मधील अजित पवार गटातील पदाधिकारी यांनी गुलाबराव देवकर यांना पक्षात घेऊ नये, असा आग्रह अजित पवारांकडे केला. याबाबत गेल्या तीन-चार दिवसापासून हालचाली होत होत्या.
गुलाबराव देवकर यांच्या पक्षप्रवेशाबाबत शिष्टमंडळाने अजित पवार यांची भेट घेतली. भेटी दरम्यान दोघांना अजित पवारांनी सध्या कोणालाही पक्षात प्रवेश दिला जाणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे ते हताश होत पुन्हा जळगावकडे रवाना झाले.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्ञानेश्वर महाजन, अरविंद मानकरी, रमेश पाटील, श्याम पाटील, नाटेश्वर पवार, पुष्पा महाजन, कल्पना अहिरे यांच्यासह ग्रामीणचे पदाधिकारी यांनी पवार यांची भेट घेऊन गुलाबराव देवकर यांना पक्षात घेऊ नका अशी मागणी केली. यावर अजित पवार यांनी कोणालाही पक्षात घेतले जाणार नाही अशी ग्वाही दिली.
आम्हाला हसू येते की, ज्यांनी आम्हाला गद्दार म्हटलं तेच पराभूत होत नाही तोच दहा दिवसाच्या आतच पक्ष बदलण्याची भाषा करीत आहे. ज्या 84 हजार मतदारांनी तुम्हाला मतदान केलं, त्यांचा विचार न करता ते लगेच पक्षांतराची भाषा करु लागले. देवकरांचे बँकेचे व मजूर फेडरेशनचे भ्रष्टाचार आहेत. हे सर्व भ्रष्टाचार बाहेर येणार असल्याने आपली कातडी वाचवण्यासाठी सत्ताधारी पक्षांमध्ये जाणार आहे. मजूर फेडरेशन चा भ्रष्टाचार मीच बाहेर काढणार असल्याने निवडणुकीमध्ये या लोकांनी मोठ्या प्रमाणात पैसा वाटप केला आहे. दहा हजार कोटी रुपये खाऊन बसलेले आहेत. ऍटलांटाची चौकशी यांच्या मागे लागणार आहे. चार वर्ष शिक्षा लागलेली आहे, त्यांना पुढचे मरण टाळण्यासाठीच त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ते भाजपात किंवा शिवसेनेत जाऊ शकत नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.