

जळगाव : आपण फिरण्यासाठी कोकणात जातो, मात्र खरे अर्धे कोकण तर याच सातपुड्यात आहे, असे उद्गार जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काढले. पाल (ता. चोपडा) येथील जंगल सफारीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार असून, थोडेसे लक्ष दिल्यास 100 हून अधिक कुटुंबांचा उदरनिर्वाह या माध्यमातून होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पाल येथील जंगल सफारी प्रकल्पाचे उद्घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार अमोल जावळे प्रमुख उपस्थित होते. उद्घाटनानंतर पालकमंत्री, आमदार जावळे आणि अधिकारी वर्गाने जंगल सफारीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. मात्र, या कार्यक्रमाला वन संरक्षण प्रादेशिक अधिकारी निनू सोमराज आणि काही इतर लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी अनुपस्थिती दर्शवली.
माध्यमांशी संवाद साधताना पालकमंत्री म्हणाले, पालच्या पर्यटन विकासासाठी डीपीडीसीच्या माध्यमातून जंगल सफारीसाठी अडीच कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला. हा प्रकल्प दुसरीकडे असता, तर किमान 15 ते 20 कोटी खर्च झाले असते.
भविष्यातील योजनांबाबत बोलताना त्यांनी सांगितले, काही निवडक स्पॉटवर पर्यटकांच्या राहण्याची व्यवस्था केली जाणार असून, त्यासाठी आणखी दोन कोटींचा निधी दिला जाईल. तसेच, धुळखात पडलेल्या हरिण पैदास केंद्राबाबतही लक्ष देण्यात येईल आणि आवश्यक बदल केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
विश्रामगृहातील प्रसिद्ध झुलता पूल हा100 टक्के दुरुस्त केला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. तसेच, जंगलात तृणभक्ष प्राण्यांसाठी गवताच्या कमतरतेमुळे ते इतरत्र अन्न शोधत जातात व त्यामुळे हिंसक प्राणी मानवी वस्त्यांकडे वळतात. यावर उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात येतील, असेही पालकमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.