

जळगाव : कुसुंबा ग्रामपंचायतीतील उपसरपंच निवडणुकीत दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्यानंतर सरपंचांनी टायब्रेकिंग मताचा अधिकार वापरत चंद्रकांत भाऊलाल पाटील यांच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे पाटील यांची उपसरपंचपदी निवड निश्चित झाली आहे.
कुसुंबा ग्रामपंचायतीत 17 सदस्य आहेत. ठरावानुसार दर सहा महिन्यांनी वेगवेगळ्या सभासदाला उपसरपंचपदाची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने या टर्मसाठी चंद्रकांत भाऊलाल पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात भूषण आबा पाटील यांनी संगीता बाळू पाटील यांचा अर्ज सादर केला होता.
गुप्त मतदान पद्धतीने पार पडलेल्या या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी आठ मते मिळाली. त्यानंतर सरपंच मिनाबाई अशोक पाटील यांनी निर्णायक मत देत चंद्रकांत पाटील यांची उपसरपंच म्हणून निवड केली.
या निवडणुकीत झालेल्या अटीतटीच्या लढतीमुळे पुढील काळात ग्रामपंचायतीतील उपसरपंच निवडणुका आणखी चुरशीच्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोणतीही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आता अल्प दिसत आहे.