

Padmalaya Storage Tank
जळगाव : धरणगाव येथील पद्मालय साठवण तलावासाठी जलसंपदा विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून या प्रकल्पासाठी 1072.45 कोटी रुपयांच्या द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
पद्मालय-2 उपसा सिंचन योजना हा मध्यम प्रकल्प असून तो तापी पाटबंधारे विकास महामंडळ "खानदेश" अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील तापी खोऱ्यात, गिरणा उपखोऱ्यात एरंडोल तालुक्यातील पद्मालय येथे आहे. या प्रकल्पांतर्गत 70.36 दलघमी क्षमतेचे धरण बांधण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे एरंडोल व धरणगाव तालुक्यातील सुमारे 9 हजार हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे.
या प्रकल्पाला सुरुवातीला 1997-98 मध्ये 95.44 कोटी रुपये इतक्या मूळ प्रशासकीय मान्यतेची तर 2016-17 मध्ये 370.94 कोटींच्या प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यतेची मंजूरी मिळाली होती. आता, 2023-24 च्या दरसूचीवर आधारित 1072.45 कोटी रुपयांच्या द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेस शासनाने हिरवा कंदील दाखवला आहे.
कार्यकारी संचालक, तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव यांनी प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार, नियोजन व वित्त विभागाच्या सहमतीने व्यय अग्रक्रम समितीच्या 23 जून 2025 रोजीच्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली.
या निधीपैकी 1049.69 कोटी रुपये कामांसाठी, 22.76 कोटी रुपये आस्थापना व अनुषंगिक खर्चासाठी तर 780 कोटी रुपये भूसंपादनासाठी वापरण्यात येणार आहेत. याशिवाय 230 कोटी रुपये उच्च न्यायालयात जमा करावयाचे असून 224 कोटी रुपये अन्य कामांवर खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे धरणगाव तालुक्यातील आणि पद्मालय तलाव परिसरातील गावांना सिंचन तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे स्थानिक शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे आणि त्यांनी शासनाचे आभार मानले आहेत.