

जळगाव : राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जामनेर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी महायुती आणि भाजपच्या विजयाबाबत ठाम भाकीत केले. महाराष्ट्रात महायुती पहिल्या क्रमांकावर राहील आणि भाजप सर्वाधिक जागा जिंकेल. जामनेरमध्ये तर विरोधकांचे खातेही उघडणार नाही, असा दावा त्यांनी केला.
एकनाथ खडसेंवर टीका करताना महाजन म्हणाले, त्यांची अवस्था आता ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’ अशी झाली आहे. त्यांना स्वतःचे चिन्ह कोणते हेही कळत नाही. कधी कमळासाठी काम करा म्हणतात, तर कधी दुसऱ्याच पक्षाचा प्रचार करतात. राजकारणात दुर्बुद्धी सुचली की माणूस कुठे पोहोचतो याचे खडसे हे उदाहरण आहे. त्यांचे राजकीय अस्तित्व संपले आहे.
विरोधकांचा सुपडा साफ होईल
महाजन म्हणाले, जामनेरमधील सर्व जागांवर भाजपचे उमेदवार जिंकतील. रोहित पवार यांचे 17 उमेदवार आहेत, त्यातील एक तरी जिंकून दाखवा असे मी सांगितले होते. पण महाविकास आघाडीतील एकाही मोठ्या नेत्याने येथे सभा घेतली नाही. रोहित पवार आता फक्त बोलण्यापुरतेच उरले आहेत.
संजय राऊत यांना प्रत्युत्तर
संजय राऊत यांच्या टीकेवर महाजन म्हणाले, त्यांच्या पक्षातून 45 आमदार निघून गेले तेव्हा ते म्हणाले होते ‘जा’. आता म्हणतात आमच्याकडे गर्दी झाली आहे. आधी उरलेले आमदार तरी सांभाळावेत.
नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत अजित पवार यांच्या वक्तव्यावर महाजन म्हणाले, मी भविष्य सांगू शकत नाही, पण त्यांच्या वक्तव्याला शुभेच्छा.” तपोवनमधील वृक्षतोड प्रकरणावर त्यांनी सांगितले की, आठ दिवसांत नाशिककरांना आनंदाची बातमी मिळेल. 15 हजार झाडे लावून पर्यावरण प्रेमींचे समाधान केले जाईल.