जळगाव : भुसावळ रेल्वे स्थानकाच्या मुसाफिर खाण्यामध्ये एका प्रवाशाची बॅगेची तपासणी करण्यात आली असता त्यात एक गावठी पिस्तूल व नऊ जिवंत काडतूस मिळून आल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी प्रकाश मुंडे (वय, 31 राहणार परळी जिल्हा बीड) या इसमास अटक केली आहे.
मध्य रेल्वेच्या सर्वात महत्त्वाचे स्थानक असलेले भुसावळ रेल्वे स्थानक या ठिकाणी रविवार (दि.13) रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे प्लॅटफॉर्मवर जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाच्या स्कॅनर मध्ये बॅग चेकींगखे काम सुरू होते. या तपासणीमध्ये प्रवासी प्रकाश मुंडे यांच्या बॅगेची स्कॅनरमध्ये तपासणी सुरु होताच त्यामध्ये पिस्तूल सदृश्य वस्तू आढळली. रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी या बॅगेमधून एक गावठी पिस्तूलासह नऊ जिवंत काडतूस जप्त केले आहे. यानंतर रेल्वे सुरक्षा बलाने हे प्रकरण लोहमार्ग पोलीस यांच्याकडे सुपूर्द केले. पोलीस निरीक्षक सुधीर गायकर यांनी रात्री उशिरा पर्यंत आरोपी प्रकाश मुंडे याची चौकशी करत आहे.