

जळगाव : संकटमोचक आणि प्रथम पूजनीय श्री गणेशाचे आगमन जळगाव जिल्ह्यातील नामदार, खासदार, आमदार व उद्योजकांच्या घरी भक्तिभावात आणि जल्लोषात झाले आहे. भाविकांसोबतच लोकप्रतिनिधींनीही विघ्नहर्त्याचे स्वागत करून संकटमोचनाची प्रार्थना केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे आणि रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार तसेच केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या जळगाव येथील निवासस्थानी बाप्पाचे आगमन मोठ्या थाटामाटात झाले. या वेळी रक्षा खडसे यांचे पुत्र गुरुनाथ निखिल खडसे यांनी गणेशाचे पूजन केले तर संपूर्ण खडसे कुटुंब भावभक्तित मग्न होऊन आरतीत सहभागी झाले.
भुसावळ विधानसभा क्षेत्राचे आमदार व सहपालकमंत्री यांच्या घरीही गणपती बाप्पाचे आनंदान आगमन झाले. त्यांच्या सुपुत्राने श्रींची आरती करून संपूर्ण कुटुंबाने विघ्नहर्त्याची प्रार्थना केली.
दरवर्षीप्रमाणे उद्योजक मनोज बियाणी यांच्या बियाणी चेंबर्स आणि बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी जल्लोषात गणपती बाप्पाचे स्वागत केले. भुसावळ येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई शाळेमध्येही पाच दिवसीय गणपती उत्सवाची सुरुवात झाली असून, रोज विद्यार्थ्यांकडून आरती आणि महाप्रसाद वितरण केले जात आहे.
दरम्यान, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या जेतवन बंगल्यावरही विधिवत पूजन करून गणेश स्थापना करण्यात आली. त्यांनी गणरायाच्या चरणी शेतकऱ्यांचे कल्याण, राज्यातील जनतेचे सुख-शांती आणि प्रत्येक घराघराला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, अशी प्रार्थना केली.
गुलाबराव पाटील म्हणाले की, या सणातून समाजातील सर्व घटकांनी एकोप्याने आणि विकासाच्या संकल्पाने एकत्र यावे, हीच खरी गणेशभक्ती आहे.
भुसावळ येथील बियाणी चेंबर्स मध्ये देखील उद्योजक व माजी नगरसेवक मनोज बियाणी यांचे सुपुत्र व सुन यांच्या हस्ते गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. रोनक बियाणी व आयुषी बियाणी यांच्या हस्ते गणपती बाप्पाचे पूजन करून आरती व प्रसाद यावेळी देण्यात आला. याप्रसंगी उद्योजक मनोज बियाणी, बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या सचिव डॉ. संगीता बियाणी, विनोद बियाणी, पियुष बियाणी, बियाणी चेंबरचे मॅनेजर गोपाल ठाकूर राजू मोरे यांच्या सह कर्मचारी आदी उपस्थित होते.
भुसावळ येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये पाच दिवसीय गणपतीची स्थापना ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत करण्यात आली. रोज नित्य नियमाने शाळेतील विद्यार्थी व शिक्षकां मार्फत आरती करून प्रसाद वाटप करण्यात येतो. मुख्याध्यापिका निना कटलर यांच्या उपस्थितीत गणपतीची स्थापना करण्यात आली. यावेळी विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
मान्यवरांसह सर्वसामान्यांच्या घरोघरी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. या कार्यक्रमाप्रसंगी जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वातावरण भक्तिभाव, उत्साह आणि जल्लोषाने भारून गेलेले पहावयास मिळाले.