

जळगाव : जिल्ह्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 'लखपती दीदी' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला बचत गटाच्या महिलांना आणण्यासाठी आठ जिल्ह्यातील 2,129 बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. तर जळगाव जिल्ह्यातील 700 पैकी 400 बसेस यात आहेत. त्यामुळे लखपती दीदी या कार्यक्रमातून जळगाव जिल्हा आगाराला साडेआठ ते नऊ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.
जळगाव जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रविवारी दि. 25 रोजी लखपती दीदी कार्यक्रम होणार आहे. यासाठी लखपती दीदी या कार्यक्रमाचे आयोजन जळगाव येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी बचत गटाच्या महिलांना जळगाव जिल्ह्यातून आणण्यासाठी व तसेच बाहेरून येणाऱ्या महिलांसाठी बसेसची सोय करण्यात आली आहे. यासाठी 2129 बसेस उपलब्ध करण्यात आल्या आहे. यामधील 1675 बसेस या नाशिक, नगर, धुळे, बीड जालना, बुलढाणा, अमरावती, अकोला या जिल्ह्यातून मागवण्यात आल्या आहेत. तर जळगाव जिल्ह्यातील 700 बसेस पैकी 400 या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमातून जळगाव जिल्हा एसटी आगाराला साडेआठ ते नऊ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. म्हणजेच "लखपती दीदी'च्या कार्यक्रमातून एसटी महामंडळ ही करोडपती होणार आहे.
याबाबत जळगाव जिल्हा बस आगाराचे उप विभागीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की रविवार असल्याने शाळेला सुट्टी आहे. त्यामुळे ती अडचण दूर झाली आहे. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फेऱ्या आहेत त्या फेऱ्या कमी करण्यात आल्या असून तालुका ते जिल्हा या फेरीमध्ये अंतर वाढवण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना अडचण होणार नाही अशी व्यवस्था केल्याचे सांगण्यात आले.- श्री बंजारा, बस आगार उपविभागीय अधिकारी