

जळगाव : भारतीय शेती आणि कृषी-उद्योगाचा चेहरा बदलणाऱ्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (FALI) या उपक्रमाचे अकरावे अधिवेशन हे येत्या रविवार, दि. 27 एप्रिल ते 4 मे या कालावधीत जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., जैन हिल्स, जळगाव येथे होणार आहे.
एकूण तीन टप्प्यांमध्ये होणाऱ्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (FALI) या अधिवेशनात महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानातील 175 शाळांमधील 1,100 हून अधिक विद्यार्थी, 90 कृषी शिक्षक आणि 11 सहकार्यकारी कंपन्यांतील 50 पेक्षा जास्त वरिष्ठ व्यवस्थापक सहभागी होणार आहेत.
अधिवेशनाचे तीन टप्पे असे...
पहिला टप्पा: 27 ते 28 एप्रिल
दुसरा टप्पा: 30 एप्रिल ते 1 मे
तिसरा टप्पा: 3 ते 4 मे
अधिवेशनात सहभागी विद्यार्थी हे शालेय पातळीवरील व्यवसाय योजना आणि ॲग्रीटेक इनोव्हेशन स्पर्धांचे विजेते आहेत. यावर्षी 15,000 हून अधिक ग्रामीण विद्यार्थी कृषी, पशुधन, ॲग्रो-एंटरप्राइज आणि ॲग्री-फायनान्स यांसारख्या विषयांवर इंटरअॅक्टिव्ह सत्रांत सहभागी झाले. हवामान बदलांचा अभ्यास, शाश्वत शेतीचे तंत्रज्ञान, उद्योग क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींशी संवाद आणि नवकल्पनांचा अभ्यास यावर या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
फालीने ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (FALI) पुढील दहा वर्षांत तीन नवीन राज्यांमध्ये विस्तार करण्याचा निर्णय घेतला असून, 2032 पर्यंत 2,50,000 माजी विद्यार्थी तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या 45,000 हून अधिक माजी विद्यार्थी फालीतून घडले आहेत. फाली इंटर्नशिप, शिष्यवृत्ती आणि सीड फंडिंगसारखे उपक्रम देखील राबवत आहेम. 90 टक्क्यांहून अधिक कंपन्यांनी फाली इंटर्न्सची कामगिरी इतर इंटर्न्सपेक्षा अधिक चांगली असल्याचे नमूद केले आहे.
या अधिवेशनात फाली ई-प्लस उपक्रमातून शहरी विद्यार्थी देखील ऑनलाइन सहभागी होणार असून, ते ग्रामीण विद्यार्थ्यांसोबत बिझनेस प्लॅन व ॲग्रीटेक इनोव्हेशन स्पर्धांमध्ये भाग घेणार आहेत. वेबिनार्स, व्हिडिओ सत्रे आणि फाली बुकलेटमधून हायड्रोपोनिक्स, स्ट्रॉबेरी व्हॅल्यू चेन व वित्तीय व्यवस्थापन या बाबींविषयी विद्यार्थ्यांना सखोल माहितीचा यामध्ये समावेश असतो.
जैन इरिगेशन, गोदरेज ॲग्रोव्हेट, युपीएल, स्टार ॲग्री, ओमनीवोर, रॅलीज इंडिया, ITC, प्रॉम्प्ट डेअरी टेक, SBI फाउंडेशन, उज्ज्वल स्मॉल फायनान्स बँक यांसह अनेक कंपन्यांचा फालीच्या अकराव्या अधिवेशानामध्ये सक्रिय सहभाग आहे. तर आगामी आर्थिक वर्षात आणखी काही कंपन्यांचा यामध्ये सहभाग होणे अपेक्षित आहे.
“ग्रामीण-शहरी साखळी निर्माण करून शेती क्षेत्रात नवउद्योजक घडवण्याची गरज आहे.”
अनिल जैन, उपाध्यक्ष, जैन इरिगेशन
“फाली इंटर्नशिप कार्यक्रम सुरूच ठेवणे महत्त्वाचे आहे.”
नादीर गोदरेज
“फालीतील युवक शेतीतील उत्पादकता वाढवतील आणि हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जातील.”
रज्जू श्रॉफ, अध्यक्ष, युपीएल
“2032 पर्यंत 2.5 लाख फाली माजी विद्यार्थी तयार करणे ही संख्या लहान वाटू शकते, पण भारतीय शेतीसाठी ती फार मोठी ठरेल.”
नॅन्सी बॅरी
या अधिवेशनात विद्यार्थी त्यांचे ॲग्रो बिझनेस आणि इनोव्हेशन प्लॅन्स सादर करणार आहेत. अधिवेशनात ग्रामीण व शहरी विद्यार्थी हे एकत्रितपणे शेतीच्या नवदृष्टीकोनाला सृजनात्मक आकार देणार आहेत.