

जळगाव : एरंडोल-कासोदा मार्गावर शुक्रवारी (दि. १ ऑगस्ट) एक भीषण अपघात घडला. भडगावहून एरंडोलकडे निघालेली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने खडके गावाजवळील नाल्यात कोसळली. या दुर्दैवी घटनेत एका ६५ वर्षीय प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून, बसमधील ४५ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
या अपघातात गुलाब तुळशीराम माळी (वय ६५, रा. सतीचे वडगाव, ता. भडगाव) यांचा मृत्यू झाला. ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी खासगी ठिकाणी पहारेकरी म्हणून काम करत होते आणि कामानिमित्त एरंडोलकडे निघाले असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल विभागाचे अधिकारी आणि एसटी महामंडळाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. जखमींना तातडीने एरंडोल ग्रामीण रुग्णालय आणि जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अनेक प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून, त्यांच्यावर एरंडोलमध्येच प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत.
अपघातानंतर क्रेनच्या साहाय्याने बसला नाल्यातून बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. प्राथमिक अंदाजानुसार, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असावा, असे म्हटले जात आहे. या घटनेमुळे मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. एरंडोल पोलीस ठाण्यात याप्रकरणी नोंद घेण्याचे काम सुरू असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.