

Dharngaon Tehsil office employee death
जळगाव : एरंडोल-पारोळा रस्त्यावर अपघातांचा सिलसिला कायम असून, निकृष्ट हायवे कामाबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. आज (दि. २०) सकाळी आणखी एक हृदयद्रावक दुर्घटना घडली.
धरणगाव तहसील कार्यालयातील कर्मचारी शिवाजी रघुनाथ महाजन (वय ४२, रा. पारोळा, ह.मु. अष्टविनायक कॉलनी, एरंडोल) हे रघुवीर समर्थक बैठक हॉलसमोर मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना, मागून येणाऱ्या भरधाव डंपरने ( एचआर ३८ एडी ४१३६) त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच एरंडोल पोलिस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू पाटील, अमोल भोसले आणि विजू पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, अपघातानंतर डंपर चालक वाहन सोडून पळून गेल्याचे आढळले. पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी एरंडोल उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे. दरम्यान, फरार डंपर चालकाचा पोलिसांकडून शोध सुरू असून, एरंडोल पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, हा डंपर एरंडोल–धरणगाव रस्त्याच्या सुरू असलेल्या कामासाठी मुरूम वाहतूक करत होता. नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत सांगितले की, निकृष्ट दर्जाचे, अपूर्ण आणि बेदरकार पद्धतीने सुरू असलेल्या हायवे प्रकल्पामुळे गेल्या काही वर्षांत २० ते २५ नागरिकांचा बळी गेला आहे. या सततच्या दुर्घटनांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर आणि संबंधित प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.