Jalgaon News | विजेचा शॉक लागून वायरमनचा मृत्यू

विद्युत पोलवर काम करताना वायरमनचा शॉक लागून मृत्यू
विद्युत पोलवर काम करत असताना वायरमनचा मृत्यू.
विद्युत पोलवर काम करत असताना वायरमनचा मृत्यू.file photo

जळगाव : महावितरणच्या कंपनीमध्ये पारोळा येथे गेल्या सहा वर्षापासून कॉन्ट्रॅक्ट बेसवर वायरमन म्हणून काम करणाऱ्या तरुणाला विद्युत पोलवर शॉक लागून त्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.६) रोजी घडली.

महावितरण कंपनीमध्ये दिनेश शमकांत भामरे (वय 32, रा.स्वामीनारायण नगर, पारोळा) हा सहा वर्षापासून कॉन्ट्रॅक्ट बेसवर वायरमन म्हणून काम करीत होता. शनिवारी (दि.६) रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दिनेश भामरे हा म्हसवे गावाच्या पुढे नगाव रोडलगत एका विद्युत पोलवर काम करत असताना त्याला शॉक लागला. त्यामुळे या खांबावरच चिटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह होता. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने दिनेशला पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. याबाबत पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दिनेश हा घरातील कर्ता पुरुष असल्याने भामरे कुटुंबीयांनी महावितरणच्या कंपनीकडून मदतीची मागणी केली आहे. जोपर्यंत महावितरण कंपनी मदतीचा हात देत नाही तोपर्यंत दिनेशवर अंत्यसंस्कार होणार नाहीत अशी भूमिका कुटुंबियांकडून घेण्यात आली होती. यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी संबंधित वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मध्यस्थी केली. अखेर भामरे कुटुंबाला आश्वासित केल्यानंतर रविवार (दि.७) रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास दिनेश भामरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, बहिण, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news