Jalgaon News : ‘निवडून आल्यावर लोकप्रतिनिधी शहरात घर थाटतात, मतदारसंघाशी नाळ तुटते’; माजी सरन्यायाधीश भूषण गवईंचे परखड मत

‘मी राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे’; गवई यांचे स्पष्ट वक्तव्य
Chief Justice Bhushan Gavai
माजी सरन्यायाधीश भूषण गवई (Pudhari File Photo)
Published on
Updated on

जळगाव : ‘मी राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे स्पष्ट वक्तव्य भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी जळगाव येथील एका महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात केले.

पुढे बोलताना भूषण गवई म्हणाले की, "महात्मा गांधी जसे सामान्य जनतेमध्ये राहिले, तसे आजच्या लोकप्रतिनिधींनीही लोकांमध्ये राहिले पाहिजे. मात्र आज परिस्थिती बदलली आहे. जिल्हा परिषद सदस्य निवडून आल्यानंतर तो शहरात आपले घर थाटतो आणि त्याचा स्वतःचा मतदारसंघ हा केवळ 'व्हिजिटिंग' पुरता मर्यादित राहतो. त्यामुळे जनतेशी असलेली नाळ तुटत चालली आहे."

ते पुढे म्हणाले, ‘मी आता दिल्लीत राहत असलो तरी दररोज मराठी वृत्तपत्रे वाचतो. त्यामुळे माझी मातीशी असलेली नाळ कायम जोडलेली राहते. महापुराच्या बातम्या पाहिल्यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित राहता येईल की नाही, अशी शंका होती. मात्र निसर्गाच्या अडचणी असूनही मी दिलेला शब्द पाळण्यासाठी येथे आलो आहे.’

शिक्षणाच्या व्यापारीकरणावर भाष्य

शिक्षण क्षेत्राबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, ‘पूर्वीची आणि आजची परिस्थिती खूप बदलली आहे. शिक्षणाचे व्यापारीकरण झाले असले तरी या संस्थेने आजही शिक्षणसेवेची परंपरा जपली आहे. येथे शिक्षक ज्ञानदानाचे कार्य निष्ठेने करत आहेत. राज्यातच नव्हे तर देशभर अनेक 'शिक्षणसम्राट' निर्माण झाले, परंतु या संस्थेत आजही शिक्षणाला सेवा म्हणून पाहिले जाते. राज्यातील शैक्षणिक परिवर्तनात या संस्थेचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळे जळगाव हे विद्येचे माहेरघर असल्याची भावना निर्माण होते.’

भाषणाच्या शेवटी त्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतील ओळी उद्धृत करत उपस्थितांना भावूक केले.

या कार्यक्रमाला माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ, माजी आमदार सुधीर तांबे, कुलगुरू व्ही. सी. महेश्वरी, महापौर दीपमाला काळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news