

जळगाव : मुक्ताईनगर येथील शासकीय अल्पसंख्यांक तंत्रनिकेतनचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करून शैक्षणिक वर्ष 2026 पासून प्रवेश प्रक्रिया सुरु करावी, अशी मागणी विधानपरिषदेत आमदार एकनाथराव खडसे यांनी केली.
खडसे म्हणाले की, अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी मुख्य प्रवाहात यावेत आणि तांत्रिक शिक्षणाद्वारे कुशल तंत्रज्ज्ञ तयार व्हावेत, या उद्देशाने 2015 मध्ये या तंत्रनिकेतनला मंजुरी देण्यात आली होती. ही इमारत बांधून तयार असली तरी गेल्या सहा वर्षांत उर्वरित कामांसाठी एकही रुपया निधी मिळालेला नाही. त्यामुळे संपूर्ण प्रकल्प निधीअभावी अडकून पडला आहे.
या तंत्रनिकेतनमध्ये प्रति शाखा 60 प्रवेश क्षमतेच्या तीन शाखांना मान्यता मिळाली असून, येथून दरवर्षी 180 पदविका धारक तंत्रज्ज्ञ तयार होऊ शकतात. इमारत पूर्ण असूनही शासनाच्या उदासीनतेमुळे संस्था सहा वर्षांपासून सुरू होऊ शकली नाही, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
उर्वरित काम, फर्निचर, मशिनरी आणि पदनिर्मितीसाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा आणि शैक्षणिक वर्ष 2026 पासून प्रवेश सुरू करण्याची प्रक्रिया हाती घ्यावी, अशी आग्रही मागणी खडसे यांनी पत्रकार परिषदेत केली.