

जळगाव : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील गुंतागुंतीचे समीकरण आता उघडपणे दिसू लागले आहे. विशेषतः मुक्ताईनगर मतदारसंघात घडलेल्या घटनांमुळे राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे.
शिवसेना (शिंदे गट) चे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगरमध्ये सभा घेऊन उमेदवारांना पाठबळ दिले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले नाहीत. त्याऐवजी त्यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे मतदारांना आवाहन केले. शिंदे यांच्या सभेनंतरच हा व्हिडिओ समोर आल्याने त्यामागील राजकीय संकेतांविषयी बोलले जात आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, एकनाथ खडसे यांच्याशी असलेल्या जुन्या मतभेदांमुळे फडणवीस यांनी मुक्ताईनगरमध्ये प्रत्यक्ष हजेरी लावणे टाळले. शिंदे यांच्या सभेनंतर खडसे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते प्रचारात उतरतील, असे सांगितल्याने समीकरणे आणखी गुंतागुंतीची झाली आहेत.
मुक्ताईनगरमधील राजकीय तर्कवितर्क लावले जात असून खडसे कुटुंबाचे राजकारण संपवण्याचा प्रयत्न? भाजप मुक्ताईनगरमध्ये शिंदे गटाला बळ देत असून, खडसे कुटुंबाचे राजकीय वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे.
फडणवीसांनी प्रत्यक्ष सभेला उपस्थित न राहणे हे पाटील यांच्यावर कोणताही नकारात्मक परिणाम होऊ नये म्हणून केले गेले असावे, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी जिल्ह्यात फक्त भुसावळ येथे सभा घेऊन मुक्ताईनगरला टाळल्याची नोंद राजकीय विश्लेषकांनी केली आहे. त्यांचा व्हिडिओ संदेश ही युतीतील अंतर्गत तणाव आणि जिल्ह्यातील गुंतागुंतीचे राजकीय स्वरूप अधोरेखित करणारी घटना आहे.