

जळगाव : निवडणुकीच्या काळात पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीत आपण 31 जागा थोडक्यात गेल्या मात्र ते शल्य बाजूला ठेवून विधानसभेत मोठ्या मताधिक्याने विजयी झालो आहोत, आता 13,000 कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. नेत्यांच्या निवडणुका संपलेल्या असून आपल्याला आता एक कोटी 50 लाख सभासद असलेले पक्ष करायचे आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याने कामाला लागावे लागेल, असे वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी शनिवार (दि.15) रोजी छत्रपती संभाजी नाट्यगृह येथे केले. उपस्थित पदाधिकाऱ्यांना ते मार्गदर्शन करीत होते.
भाजपची पक्ष कार्यशाळा जवळपास दीड तास उशिराने सुरू झाली. या कार्यशाळेप्रसंगी जामनेरचे आमदार गिरीश महाजन, केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे हे मात्र दिसले नाही. देश कार्याध्यक्ष राजेंद्र चव्हाण, खासदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण, आमदार सुरेश भोळे, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, आमदार अमोल जावळे, विक्रांत पाटील आदी उपस्थित होते.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे म्हणाले की, देशाचा व महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न फक्त नरेंद्र मोदीच पूर्ण करू शकतात. आपल्या लोकसभेमध्ये 31 जागा थोडक्यात गेल्या, या 31 जागांचे अवलोकन केले असता त्या त्रुटींवर काम केले व विधानसभेत चार महिन्याच्या अवधीमध्ये कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाची फलश्रुती म्हणजे मोठ्या प्रमाणात झालेला महायुतीचा विजय आहे. लोकसभेत विजय मिळवल्यानंतर आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जोश आहे. संपूर्ण राज्यात प्रशासन व अधिकारी हे आघाडीचे सरकार येईल असे शक्यता वर्तवित होते. मात्र कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनत व नियोजनामुळेच सर्व चित्र बदलले आहेत. त्यामुळेच येत्या काळात राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनवण्यासाठी एक कोटी 51 लाख सदस्य नोंदणी करायचे उद्दिष्ट समोर आहे व ते आपल्याला पूर्ण करायचे आहे. आतापर्यंत एक कोटी बारा लाख सदस्यांची नोंदणी झालेले आहे. उर्वरित येत्या काही दिवसात त्या पूर्ण करून आपल्याला सर्वात मोठा सदस्य असलेला पक्ष निर्माण करायचा असेही बावनकुळे यांनी सांगितले. यावेळी तीन कोटी 69 हजार मते मिळाली तर काँग्रेस आघाडीला दोन कोटी 17 लाख मते मिळाली आहेत, हे कार्यकर्त्यांमुळेच शक्य झाले असल्याचे चंद्रकांत बावनकुळे यांनी सांगितले.
येत्या काळात 13,000 कार्यकर्त्यांना मनपा नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या ठिकाणी उतरवणार आहे. यावेळी 51 टक्के ची निवडणूक राहणार आहे, या स्टेजवर सर्व महापौर, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती अध्यक्ष हे भविष्यात दिसतील. नेत्यांच्या निवडणुका संपलेल्या आहेत आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. उत्तर महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्याबाबत त्यांनी सांगितले की, जेथे आमदार आहेत तेथे सदस्य संख्या पूर्ण झालेली आहे मात्र ज्या ठिकाणी आमदार नाहीत, त्या ठिकाणी सदस्य नोंदणी अत्यंत अल्प प्रमाणात झालेली आहे. महिलांना 33 टक्के आरक्षण आहे, त्यामुळे भविष्यात आम्हालाही माघार घ्यावी लागणार आहे सहा विधानसभा सोडल्यास सर्वजण मागे असल्याचे खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.