

Chalisgaon Jamner Theft Case
जळगाव : जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव शहर आणि जामनेर येथे चोरीच्या दोन स्वतंत्र घटना घडल्या असून अज्ञात चोरट्यांनी एकूण ३ लाख २० हजार ३४० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपींचा शोध सुरू आहे.
चाळीसगाव शहरातील गजानन कन्स्ट्रक्शन परिसरात राहणारे सेवानिवृत्त चंदन बाळकृष्ण अमृतकर (वय ६७) हे गावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील रोख रक्कम, सोन्याचे दागिने तसेच बँक लॉकरची चावी असा एकूण २ लाख ५४ हजार ३४० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
ही घटना ८ जून ते २१ जुलै २०२६ या कालावधीत घडली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३५६/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५, ३३१(३) व ३३१(४) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी करीत आहेत.
दरम्यान, जामनेर येथे बसप्रवासादरम्यान एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरट्यांनी लंपास केली. आशालता जगन्नाथ पाटील (वय ७०, रा. नांद्रा प्र. लो., ता. जामनेर) या जामनेर बसस्थानकातून नांद्रा मार्गावरील बसने प्रवास करत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ६६ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत चोरून नेली. ही घटना २४ जुलै २०२६ रोजी घडली. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४३/२०२६ भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार प्रतापसिंग मथुरे करीत आहेत.
या दोन्ही घटनांतील आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत. स्थानिक नागरिकांनीही सतर्क राहून संशयास्पद हालचालींची माहिती तातडीने पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.