

जळगाव : शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांच्या दारात जाण्याऐवजी त्यांच्या हक्काच्या अनुदानावरच डल्ला मारणाऱ्या अधिकारी अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. पाचोरा येथील उप कृषी अधिकारी लिलाधर शिवाजीराव देशमुख याच्यासह त्याच्या दोन खासगी हस्तकांना ५ हजार रुपयांची लाच घेताना सोमवारी रंगेहाथ अटक करण्यात आली. या कारवाईमुळे कृषी विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
पाचोरा तालुक्यातील जोगेदगाव येथील एका तक्रारदार शेतकऱ्याने शासन योजनेतून नांगर आणि रोटाव्हेटर खरेदी केले होते. या साहित्यासाठी मिळणारे शासकीय अनुदान मंजूर व्हावे, यासाठी त्यांनी पाचोरा येथील कृषी कार्यालयात अर्ज केला होता. हे अनुदान मिळवून देण्यासाठी उप कृषी अधिकारी लिलाधर देशमुख याने स्वतःचे खिसे गरम करण्यासाठी ६ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीनंतर ५ हजार रुपये देण्याचे ठरले.
ही रक्कम स्वतः न स्वीकारता आपल्या खासगी हस्तकांमार्फत घेण्याचे कारस्थान रचले होते. मात्र, स्वाभिमानी शेतकऱ्याने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने आबेदगाव येथील 'धनदाई कृषी केंद्रा'वर सापळा रचला. ठरल्याप्रमाणे ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना संजय प्रभाकर पाटील आणि नितीन इंदलसिंग निकम या दोन खासगी इसमांना पथकाने झडप घालून पकडले. या व्यवहारामागे मुख्य सूत्रधार लिलाधर देशमुख असल्याचे स्पष्ट होताच, त्यालाही बेड्या ठोकण्यात आल्या.
ही धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक योगेश ठाकूर, अपर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे आणि त्यांच्या पथकाने केली. आरोपींविरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला.