

जळगाव : बाप्पाच्या विसर्जनावेळी ममुराबाद येथील 25 वर्षीय गणेश कोळी गणपती विसर्जनादरम्यान कुटुंबीयांच्या डोळ्यांसमोर गिरणा नदीत वाहून गेला. यावेळी कोळी कुटुंबाचा काळीज चिरणारा आक्रोश होता. ही घटना निमखेडी शिवारातील नवीन बायपासलगत गिरणा नदीपात्रात घडली.
गिरणा पंपिंग या भागातही अशीच दुसरी घटना घडली असून राहुल सोनार,कोल्हे हिल्स, जळगाव याचाही गिरणा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. या दोन्हींचा शोध आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून घेण्यात येत आहे.
आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना जळगावात काळीज चिरणारी घटना घडली आहे. जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील कोळी कुटुंबीय घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यासाठी निमखेडी शिवारातील नवीन बायपासलगत असलेल्या गिरणा नदीकडे आले होते. विसर्जनासाठी गणेश गंगाधर कोळी हा 25 वर्षीय तरुण मूर्ती घेऊन नदीपात्रात उतरला. त्यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे आणि गिरणा धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीचा प्रवाह अधिकच वेगवान होता. या जोरदार प्रवाहात गणेश कोळी वाहून गेला आणि बेपत्ता झाला.
ही घटना आई-वडील व कुटुंबीयांच्या डोळ्यांसमोर घडल्याने त्यांना जबर मानसिक धक्का बसला आहे. तर गिरणा पंपिंग या भागातही राहुल सोनार,कोल्हे हिल्स, जळगाव हा विसर्जनाला आला असताना गिरणा नदीमध्ये वाढलेल्या पाण्यात त्याचाही बुडून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आपत्ती व्यवस्थापन पथक व अन्य संबंधित विभागांना पाचारण केले. सध्या या तरुणाचा शोध नदीपात्रात सुरू असून प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने शनिवारी रात्री वाजेपर्यंत गणेश पुढे याचा गिरणा नदीपात्रात शोध घेतला परंतु धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने शोध कार्यात अडथळे आले. त्यामुळे आज सकाळी पुन्हा शोध कार्याला सुरुवात करण्यात आली आहे.
गिरणा काठावरील खेडी व नगरी उपनगरी तसेच कानडदा गावालगतच्या नदीपात्रातही गणेशचा शोध घेतला जात आहे. दरम्यान गिरणा धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून 9768 क्युसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे गिरणा नदी पात्रातील पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान आहे.
आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीने शोधकार्य सुरू असून कुटुंबीयांना शोक अनावर झाला. रविवारी सकाळपासूनच गिरणा नदी काठावरील गावांच्या नदीपात्रात शोधकार्य सुरू आहे.