

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील जामनेर नगरपंचायत निवडणुकीदरम्यान प्रभाग क्रमांक १० मधील एकलव्य शाळेच्या मतदान केंद्रावर आज सोमवार (दि.2) रोजी गोंधळ झाला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या कार्यकर्त्यांनी बोगस मतदानासाठी एक तरुण आल्याचा संशय असलेल्या तरुणाला थेट केंद्रावरच पकडले.
प्रकार कसा उघडकीस आला?
मतदान केंद्रावर काही संशयास्पद हालचाली दिसल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संशयित तरुणावर लक्ष ठेवले. या तरुणाच्या वर्तनावर शंका घेत त्यांनी त्याला थांबवून चौकशी केली. या दरम्यान त्या तरुणाने कॅमेऱ्यासमोरच बोगस मतदानासाठी आल्याची कबुली दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे ही घटना अधिक गंभीर बनली.
कार्यकर्त्यांनी तरुणास पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. विरोधकांनीही निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करणाऱ्या अशा प्रकारांवर तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी केली. संशयित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी पोलीस ठाण्यात नेले असून या घटनेमुळे काही काळ मतदान केंद्रावर तणाव निर्माण झाला.