

जळगाव : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह जिल्ह्यातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देणारे मेल प्राप्त झाले असून, यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, हा धमकीचा मेल मुख्यमंत्री कार्यालयात (CMO) प्राप्त झाला होता. त्यानंतर खबरदारी म्हणून संबंधित मेल जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आला. गेल्या मार्च महिन्यात अशा स्वरूपाचे वेगवेगळे मेल प्राप्त झाले असून, "जळगावात अशांतता पसरवून, अधिकाऱ्यांना ठार करू" अशा स्वरूपाचे मजकूर त्यात होते. शेवटचा मेल 27 मार्च रोजी प्राप्त झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेश्वरी रेड्डी यांनी दिली.
पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, मेलमध्ये अतिशय गंभीर आशय नसला तरीही खबरदारीचा उपाय म्हणून तपास सुरू आहे. या मेलमध्ये डार्क वेबचा वापर झाल्याचे कोणतेही संकेत सापडलेले नाहीत. तरीही सायबर पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, "हा प्रकार गंभीर असून, ज्या व्यक्तीने मेल पाठवले त्याचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. संपूर्ण चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल."