

जळगाव : भुसावळ नगर परिषद निवडणुकीसाठी एबी फॉर्म भरताना मोठा गोंधळ उडाला आहे. छाननीदरम्यान अनेक उमेदवारांच्या अर्जांसोबत चुकीचे किंवा त्यांनी मागितलेच नव्हते असे एबी फॉर्म जोडल्याचे समोर आले. या गोंधळाचा फटका प्रभाग क्रमांक सातमधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या उमेदवार सारिका युवराज पाटील यांना बसला. चुकीचा एबी फॉर्म जोडल्यामुळे त्यांचे नामांकन निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अवैध ठरवले आहे.
मॅनेज झाले आहेत...
यावरून युवराज पाटील यांनी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांच्यावर गंभीर आरोप केले. माध्यमांशी बोलताना त्यांनी जिल्हाध्यक्ष “मॅनेज झाले आहेत” आणि “भाजपाची बी टीम म्हणून काम करतात” असा आरोप केला. ते पुढे म्हणाले की, सारिका पाटील यांच्या नावाने द्यायचा एबी फॉर्म जिल्हाध्यक्षांनी पाटील युवराज पुंडलिक या नावाने देत थेट प्रांत कार्यालयात जमा केला. “फॉर्म आम्ही मागितला होता, पण आमच्या जवळ न देता थेट वर जमा करून आमचा विश्वासघात करण्यात आला,” असा आरोप पाटील यांनी केला.
युवराज पाटील यांनी भाजप नेते चंद्रशेखर अत्तरदे आणि राष्ट्रवादीचे नामदार संजय सावकारे यांच्या हस्तक्षेपाचीही शक्यता व्यक्त केली. या सगळ्या हालचालींमुळेच आमची सीट मुद्दाम पाडण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
या आरोपांवर प्रतिक्रिया देताना उमेश नेमाडे म्हणाले की, “चुकीची नोंद झालेली मान्य आहे, पण ती जाणूनबुजून केलेली नाही. त्यांच्या घरातील दुसरीही एक उमेदवारी आमच्या पक्षाकडून आहे. त्यामुळे मॅनेज करण्याचा प्रश्नच येत नाही.”
युवराज पाटील यांचा राग योग्य असला तरी तो व्यक्त करण्याची पद्धत चुकीची असल्याचेही नेमाडे यांनी यावेळी सांगितले.