भुसावळ पालिकेत 'लाडका नगरसेवक' योजनेचा सुळसुळाट? पहिल्याच सभेत भाजपची तोफ धडाडली

​'पानबुडी'च्या व्याख्येवरून अधिकाऱ्यांची दाणादाण; प्रभाग २ मधील ४२ विषयांवरून सत्ताधारी-विरोधक भिडले
भुसावळ नगरपरिषद / Bhusawal Municipal Council
भुसावळ नगरपरिषद / Bhusawal Municipal CouncilPudhari News Network
Published on
Updated on

​भुसावळ: नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर आज छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडलेली पहिलीच सर्वसाधारण सभा अपेक्षेप्रमाणे वादळी ठरली. प्रभाग क्रमांक २ मधील विकासकामांचा पाऊस पाहून 'येथे लाडका नगरसेवक योजना राबवली जात आहे का?' असा खोचक सवाल करत भाजपचे गटनेते युवराज लोणारी यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. पाणीटंचाईच्या प्रश्नावर 'पानबुडी' म्हणजे काय, हे स्पष्ट करण्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संकुलातील गाळ्यांच्या प्रश्नावरूनही सभागृहात जोरदार खडाजंगी झाली.

प्रभाग २ वरून रणकंदन; नगरसेवक भिडले

आजच्या सभेचे मुख्य आकर्षण ठरले ते प्रभाग क्रमांक २ मधील तब्बल ४२ विषय! एकाच प्रभागासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर विषय मंजुरीसाठी ठेवल्याने भाजप गटनेते युवराज लोणारी यांनी सत्ताधाऱ्यांवर शरसंधान साधले. "प्रशासनाकडून लाडका नगरसेवक योजना सुरू आहे का?" असा टोला त्यांनी लगावला. यावरून नगरसेवक सचिन पाटील आणि लोणारी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. वादाचे पर्यावसान दोन्ही गट आमनेसामने येण्यात झाले, ज्यामुळे सभागृहात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण होऊन कामकाज थांबवावे लागले. अखेर ज्येष्ठ नगरसेवक संतोष चौधरी यांनी मध्यस्थी करत वातावरण शांत केले.

भुसावळ नगरपरिषद / Bhusawal Municipal Council
Nashik news | गो शाळेच्या नावाखाली शासकीय जागेवर केलेले अतिक्रमण हटवले

​अधिकाऱ्यांची 'पानबुडी' बुडाली!

उन्हाळ्यातील पाणीटंचाई निवारण्यासाठी नदीपात्रातून 'पानबुडी'द्वारे पाणी उचलण्याच्या विषयावर (विषय क्र. २२) चर्चा सुरू असताना मोठा विनोद घडला. 'पानबुडी' म्हणजे प्रशासकीय भाषेत नेमके काय? असा प्रश्न नगरसेवकांनी विचारला असता, उपस्थित अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. अधिकाऱ्यांच्या या अज्ञानावर सर्वच नगरसेवकांनी तीव्र संताप व्यक्त करत नाराजी दर्शविली.

आंबेडकर संकुल गाळे प्रश्नी भाजप आक्रमक

सिटी सर्व्हे १६१ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संकुलाच्या दुरुस्तीसह ६० गाळे आरक्षित ठेवण्याच्या प्रक्रियेला भाजपने कडाडून विरोध केला. यापूर्वीच्या ५७ गाळेधारकांना न्याय देण्याची मागणी युवराज लोणारी यांनी लावून धरली. तसेच स्मशानभूमीसाठी लाकडे व गौऱ्या पुरवण्याच्या विषयात मागील ऑडिटमधील आक्षेपांची आठवण करून देत, हा विषय अत्यंत पारदर्शकपणे राबवण्याची सूचना लोणारी यांनी केली.

भुसावळ नगरपरिषद / Bhusawal Municipal Council
Nashik News | नाशिकच्या बालेकिल्ल्यात जळगावच्या व्यापाऱ्याला न्याय

​सरदार पटेलांच्या तैलचित्राला मंजुरी

सभेत वादाचे अनेक मुद्दे रंगले असले तरी, आयत्या वेळच्या विषयात सरदार वल्लभभाई पटेल यांचा फोटो सभागृहात लावण्याच्या प्रस्तावाला सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली. ​सभेला नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, उपनगराध्यक्षा शैलैजा नारखेडे, ज्येष्ठ नगरसेवक संतोष चौधरी, राष्ट्रवादीचे गटनेते सचिन चौधरी, भाजप गटनेते युवराज लोणारी, मुख्याधिकारी विवेक धांडे यांच्यासह बहुतांश नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news