

जळगाव : लग्न कार्यातील गर्दीचा फायदा घेऊन नववधूच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या मध्यप्रदेशातील सराईत टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. भुसावळ येथील बालाजी लॉनमध्ये झालेल्या चोरीचा तपास लावत पोलिसांनी चक्क मध्यप्रदेश गाठले आणि तेथून १ लाख ९२ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे आंतरराज्यीय चोरट्यांचे धाबे दणाणले आहेत.
नेमकी घटना काय?
भुसावळ येथील सौ. उज्वला प्रबोध भावे यांचा मुलगा संकेत याचा ६ फेब्रुवारी २०२६ रोजी बालाजी लॉन येथे विवाह सोहळा होता. या सोहळ्यात नववधू कांचन हिचे दागिने एका पर्समध्ये ठेवलेले होते. लग्नविधी सुरू असताना दुपारी ४ वाजेच्या सुमारास सोफ्यावर ठेवलेली ही दागिन्यांची पर्स अज्ञात चोरट्याने लंपास केली होती. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी यांनी या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेला सोपवला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण केले. तपासात ही चोरी मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यातील बोडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या 'कढीया सांसी' येथील टोळीने केल्याचे निष्पन्न झाले.
वरिष्ठांची परवानगी घेऊन एलसीबीचे पथक १९ ते २७ फेब्रुवारी दरम्यान मध्यप्रदेशात तळ ठोकून होते. आरोपी रितीक सिंकदर सिसोदिया आणि कृषी निरज बेडीया यांचा शोध घेत असताना, चोरलेले दागिने आरोपी कृषी निरज बेडीया दोन्ही राहणार-कहीया सांसी, तहसिल नरसिंहपुर, जि-राजगढ (म.प्र.) याने यातील चोरलेल्या दागीन्यापैकी काही दागीने हे त्याचा मावशीचा पती नरोत्तम विक्रम सिसोदीया (रा-गुलखेडी, ता-नरसिंहपुर, जि-राजगढ़) यांचेकडे त्याचे दागीने आहेत व तो गावाला जात असलेने सांभाळण्याकरिता नरोत्तम याचेकडे ठेवले. यातील नरोत्तम यांनी सदरचे दागीने उपसंरपच संजय कन्हैयालाल सीसोदीया यांचेमार्फत ते बोडा पोलीस स्टेशनला हजर केले. यात ४० ग्रॅम सोन्याची पोत (किंमत १,९२,४०० रुपये) आणि चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ९२ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय राहुल गायकवाड, पीएसआय शरद बागल, रवी नरवाडे, पोहेकॉ गोपाळ गव्हाळे, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे आणि प्रमोद ठाकूर यांनी ही यशस्वी कामगिरी केली. जप्त केलेले दागिने फिर्यादींना दाखवून ओळख पटवण्यात आली असून पुढील तपासासाठी भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत.
भुसावळ येथील सौ. उज्वला प्रबोध भावे यांचा मुलगा संकेत याचा ६ फेब्रुवारी २०२६ रोजी बालाजी लॉन येथे विवाह सोहळा होता. या सोहळ्यात नववधू कांचन हिचे दागिने एका पर्समध्ये ठेवलेले होते. लग्नविधी सुरू असताना दुपारी ४ वाजेच्या सुमारास सोफ्यावर ठेवलेली ही दागिन्यांची पर्स अज्ञात चोरट्याने लंपास केली होती. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.