जळगाव : बैलपोळा शेतकऱ्याचा जीवनातील एक महत्त्वाचा सण आहे. ज्या शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे जीवनप्रवास थांबवला आहे. अशा शेतकऱ्यांच्या घरी बैलपोळा (Bailpola Festival) साजरा व्हावा याकरिता जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बैलाचा साज आणि महिन्याभराच्या किराणा सामान देऊन त्यांच्या बैलपोळा गोड केला आहे.
बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे. कृषीप्रधान या देशात बैलपोळा सणाला (Bailpola Festival) विशेष महत्व आहे. शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. शेतकर्याचा सखा, मित्र सर्जा- राजाचा आजचा दिवस मानाचा असतो. पण, ज्या शेतकऱ्यांनी काही कारणांनी जीवनप्रवास थांबवला आहे, अशा कुटुंबीयांचा आधार म्हणजे सर्जा राजा असतो. अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बैलपोळा निमित्त बैलांसाठीचा आकर्षक साजचे वाटप करत या बळीराजाचा बैलपोळा गोड केला. पालकमंत्री गुलाबराव पाटील व माजी जिल्हा परीषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्यातर्फे जीवनप्रवास थांबविल्याच्या घटनेतील शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आधार म्हणून ज्यांच्याकडे बैलजोडी आहे. त्यांच्या बैलांना पोळ्यानिमित्त सजविण्यासाठी बैलपोळाचा साज व ज्यांच्याकडे बैलजोडी नाही त्या कुटुंबाचा पोळा गोड व्हावा म्हणून महिन्याभराचा किराणा शिवसेना पदाधिकारी व गावातील कार्यकर्त्यांच्या मार्फत घरपोच पोहोचविण्यात आला आहे.
धरणगाव तालुक्यातील नांदेड, धरणगाव, सोनवद बु, भोदवड बु, भवरखेडा, पिंपळेसिम व चिंचपुरा तसेच जळगाव तालुक्यातील जामोद, धानवड, लमांजन, म्हसावद, सुभाषवाडी, पाथरी, दापोरे, शिरसोली, कंडारी व गाढोदे या गावातील जीवनप्रवास थांबविण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना बैलपोळ्यानिमित्त गोडाधोडाचे जिन्नस वाटप केले.