आगीची अफवा अन् पुष्पक एक्स्प्रेसमधून प्रवाशांच्या उड्या, १२ ठार, नेमकं काय घडलं?

Jalgaon Train Accident | मोठी दुर्घटना- घटनास्थळी बचावकार्य सुरु
Jalgaon Train Accident
जळगावमध्ये बुधवारी रेल्वे अपघाताची मोठी दुर्घटना घडली.(Pudhari Photo)
Published on
Updated on

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : जळगावमध्ये बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. जळगाव आणि पाचोरा स्थानकादरम्यान आग लागल्याच्या भीतीने पुष्पक एक्स्प्रेसमधील अनेक प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या. याचदरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने प्रवाशांना धडक दिली. या दुर्घटनेत किमान १२ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याच्या भीतीमुळे प्रवाशी खाली उतरले. याच दरम्यान पाचोऱ्या तालुक्याजवळील नांद्रा ते परधाडे दरम्यानच्या ठिकाणी दुसऱ्या रेल्वे ट्रॅकवर येणाऱ्या न्यू दिल्ली बंगळूर एक्स्प्रेसखाली येऊन १२ प्रवासी ठार झाले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळी जिल्हाधिकारी, आपत्ती व्यवस्थापन, रेल्वे डीआरएम आणि अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पाचोरा तालुक्यातील परधाडे या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन पोहोचले असून त्यांनी घटनेची पूर्ण माहिती घेऊन जखमींना पाचोरा येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

Jalgaon Train Accident
पाचोरा तालुक्यातील परधाडे येथे झालेल्या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली आहे. (Pudhari Photo)

पुष्पक एक्स्प्रेसमधील प्रवासी गाडीतून खाली उतरून ट्रॅकवर आले होते. त्याचवेळी शेजारील ट्रॅकवरून बंगळूर एक्स्प्रेस जात असताना ही दुर्घटना घडली. आम्ही घटनास्थळी आहोत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी आणि सर्वजण घटनास्थळी जात आहोत. आम्ही डीआरएम आणि रेल्वे अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहोत. उपलब्ध माहितीनुसार, ८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत, रेल्वे आणि रेल्वे रुग्णवाहिकांच्या अतिरिक्त रेस्क्यू व्हॅन घटनास्थळी रवाना करण्यात येत आहेत, असे नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम एएनआय वृतसंस्थेशी बोलताना सांगितले.

Jalgaon Train Accident | नेमकं काय घडलं?

रेल्वे बोर्डाच्या माहिती आणि प्रसिद्धी विभागाचे कार्यकारी संचालक दिलीप कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, "काही प्रवाशांनी पुष्पक एक्स्प्रेसमधील अलार्म चेन ओढली आणि ते गाडीतून खाली उतरले. याच दरम्यान बंगळूर- नवी दिल्ली कर्नाटक एक्स्प्रेस दुसऱ्या बाजूने येत होती. भुसावळहून अनेक लोक रेल्वेमध्ये चढले होते आणि त्यापैकी एकाने अलार्म चेन ओढली. त्यानंतर ते गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी भीतीने चुकीच्या पद्धतीने रेल्वे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न केला असावा. तसेच ते रुळावर उभे असावेत. यामुळे त्यांना रेल्वेने धडक दिली. भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक घटनास्थळी रवाना झाले आहेत. वैद्यकीय पथक तेथे आहे. स्थानिक प्रशासनदेखील घटनास्थळी आहे. रेल्वेचे वरिष्ठ विभाग अभियंतादेखील तेथे आहेत. इतर वरिष्ठ डॉक्टर आणि रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे."

जळगाव जिल्ह्यातील रेल्वे दुर्घटना वेदनादायी- फडण‍वीस

जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी X ‍‍‍‍वर पोस्ट करत म्हटले आहे. ''माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून, जिल्हाधिकारी काही वेळात तेथे पोहोचत आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करीत असून, जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत. ८ रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खासगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. ग्लासकटर, फ्लडलाईट्स इत्यादी आपातकालीन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन असून, आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्यात येत आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे.'' असे फडणवीस यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news