

जळगाव: पाचोरा तालुक्यातील कोकडी येथील एका शेतकऱ्याच्या शेताच्या सातबारा उताऱ्यात पोटखराब क्षेत्र दाखवले असल्याने त्याला नुकसान भरपाई आणि कर्ज मिळण्यात अडथळा येत होता. हे क्षेत्र विहित स्वरूपात दाखवून देण्यासाठी सहाय्यक महसूल अधिकारी गणेश लोखंडे यांनी तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांची लाच मागितली होती.
तक्रारदाराने सुरुवातीला ५ हजार रुपये रोख दिल्यानंतर, उर्वरित १० हजार रुपये दिल्यावर काम करून देण्याचे लोखंडे यांनी आश्वासन दिले. त्यानंतर आज (१० रोजी) दुसरा हप्ता म्हणून १० हजार रुपये स्वीकारताना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंत नागरे, तसेच अधिकारी भूषण पाटील, राकेश दुसाने आणि अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.