

जळगाव: जळगाव बसस्थानकावरून चाळीसगावकडे जाणाऱ्या बसमध्ये कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये वाद झाल्याची घटना घडली. या वादात महिलेच्या नाकाजवळ दुखापत होऊन रक्तस्राव झाल्याने बस जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अर्धा तास खोळंबली. या घटनेनंतर पोलिसांची कार्यक्षमता आणि तत्परता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतआहे.
जळगाव बसस्थानकावरून पाचोरा डेपोची एम.एच. 40 एन 9066 ही बस दुपारी 1 वाजता चाळीसगावकडे रवाना झाली. प्रवाशांची संख्या अधिक असल्याने बसमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. बस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थांबली असता प्रवासी संदीप राठोड आणि त्याची पत्नी किरण राठोड यांचा कंडक्टरशी वाद झाला. या वादातून कंडक्टरने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप किरण राठोड यांनी केला. तर कंडक्टरने सांगितले की, प्रवाशानेच आपल्याला मारहाण केली आहे. या वादात किरण राठोड महिलेला दुखापत होऊन तिच्या नाकातून रक्तस्राव होऊ लागला.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात संपर्क साधण्यात आला. मात्र, या पोलीस ठाण्यातून कर्मचारी पाठवण्याचे नुकतेच आश्वासन देण्यात आले. 20 मिनिटांपर्यंत कोणीही घटनास्थळी आले नाही. त्यानंतर 112 क्रमांकावर संपर्क साधण्यात आला. संबंधित पोलिसांनी महिलेबद्दलची अधिक माहिती विचारली, मात्र तक्रारदाराकडे ती माहिती उपलब्ध नव्हती. अखेर बीट अंमलदाराने संबंधित व्यक्तीला फोन केला.
अर्धा तास उलटूनही कोणीही घटनास्थळी पोहोचले नाही, त्यामुळे डीवायएसपी संदीप गावित यांना संपर्क साधण्यात आला. त्यांनी जिल्हा पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि बस तसेच संबंधित पती-पत्नी राठोड यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या प्रतिसादाच्या वेगावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. अर्ध्या तासाने पोलीस घटनास्थळी पोहोचल्याने नागरिकांमध्ये नाराजी उमटत आहे.