

जळगाव : जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे मंदिरातील नंदीच्या मूर्तीची विटंबना केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. या घटनेने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आठ दिवसांपूर्वी श्री त्रिविक्रम मंदिराजवळ नंदीच्या मूर्तीची विटंबना केल्याचा प्रकार घडला होता. त्यापाठोपाठ शेंदुर्णीतही अशाच स्वरुपाची घटना घडल्याने भाविकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
भावसार गल्लीतील श्री ओमकारेश्वर महादेव मंदिरात नंदीच्या मूर्तीची विटंबना झाल्याचे सकाळच्या सुमारास निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळताच भाविक मोठ्या संख्येने मंदिर परिसरात जमले. पोलीस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला.
संतप्त नागरिक आधी नगरपंचायत कार्यालयावर धडकले. मात्र कार्यालयात कोणीही नसल्याने जमाव जामनेर–पाचोरा रोडवरील नाक्याकडे वळला व तेथे रस्ता रोको आंदोलन सुरू केले. नागरिकांनी “मुख्याधिकाऱ्यांना हजर करा” अशा घोषणा देत प्रशासनाविरोधातील रोष व्यक्त केला.
घटनेची गंभीर दखल घेत पोलीस उपाधीक्षक बापू रोहम व तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी घटनास्थळी पोहोचून जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी मुख्याधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहावेत, अशी मागणी ठामपणे मांडली. काही काळ तणाव निर्माण झाला. अखेर तहसीलदार आगळे यांनी पुढाकार घेत उर्वरित सर्व मंदिरांवर सीसीटीव्ही बसवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर नागरिक शांत झाले.