

जळगाव : धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे दारू पिण्यावरून झालेल्या वादातून मुलाने लोखंडी विळ्याने हल्ला करून ७५ वर्षीय वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मृत वडिलांचे नाव छगन यादव कोळी (वय ७५) असून, पोलिसांनी आरोपी मुलगा समाधान छगन कोळी (वय ४२) याला अटक केली आहे. मंगळवार (दि.5) रोजी रात्री १० वाजता समाधान कोळी दारू पिऊन घरी आला. यावेळी दारू पिण्याच्या कारणावरून वडील आणि मुलामध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर समाधानने लोखंडी विळ्याने वडिलांच्या पोटावर जबर वार केले.
गंभीर जखमी छगन कोळी यांना तात्काळ जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान सोमवार (दि.11) रोजी पहाटे ३ वाजता वडीलांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, धरणगाव पोलिसांनी समाधान कोळीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत खंडारे पुढील तपास करत आहेत.