

जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना स्वतःच्याच 'श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळा'ला नियमबाह्य पद्धतीने १० कोटी रुपयांचे कर्ज दिल्याप्रकरणी ते दोषी आढळले आहेत.
सहकार विभागाच्या चौकशी अहवालात त्यांच्यावर पदाचा गैरवापर केल्याचा स्पष्ट ठपका ठेवण्यात आला असून, या वृत्ताने जळगावच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणाची सुरुवात धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे संचालक एस. जी. पाटील यांनी दाखल केलेल्या तक्रारीने झाली. देवकर जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना, तेच 'श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळा'चेही अध्यक्ष होते. बँकिंग नियमांचे उल्लंघन करून त्यांनी आपल्याच संस्थेला कर्ज मिळवून देण्यासाठी पदाचा गैरवापर केला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.
या तक्रारीनंतर धुळे जिल्ह्याचे उपनिबंधक मनोज चौधरी यांनी या प्रकरणाची चौकशी केली. त्यांच्या अहवालानुसार, जिल्हा बँकेने श्रीकृष्ण मंडळाला ६ मार्च २०२१ रोजी ७ कोटी आणि १३ जून २०२२ रोजी ३ कोटी, असे एकूण १० कोटी रुपयांचे कर्ज दिले. विशेष म्हणजे, या कर्जाची परतफेड नियमित सुरू असून संस्था सध्या थकबाकीदार नाही. मात्र, कर्ज देताना 'बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट १९४९' च्या कलम २० चे थेट उल्लंघन झाल्याचे अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे. या कलमानुसार, बँकेचा कोणताही संचालक स्वतःच्या किंवा हितसंबंध असलेल्या संस्थेला कर्ज देऊ शकत नाही. या प्रकरणात बँक आणि कर्जदार संस्था या दोन्हींचे नियंत्रण एकाच व्यक्तीकडे (गुलाबराव देवकर) असल्याने हा नियम सरळसरळ मोडण्यात आला आहे.
चौकशी समितीच्या या अहवालामुळे गुलाबराव देवकर यांच्यावर कायदेशीर कारवाईची टांगती तलवार आहे. पदाचा गैरवापर सिद्ध झाल्याने त्यांच्या राजकीय भवितव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणामुळे आगामी काळात जळगावचे राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.