जळगाव : समतानगर येथे जुन्या वादातून तरुणाचा धारधार शस्त्राने वार करुन खून, दोन जण जखमी | पुढारी

जळगाव : समतानगर येथे जुन्या वादातून तरुणाचा धारधार शस्त्राने वार करुन खून, दोन जण जखमी

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : शहरातील समता नगर येथे आज (दि. १०) दुपारी जुन्या वादातून एका तरुणावर शॉपर व कोयत्याने हल्ला करून निर्घृण खून केल्याची घटना घडली. या घटनेत सोबत असलेले अन्य दोघेजण जखमी झाले असल्याची माहिती आहे. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. अरुण सोनवणे असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रामानंद पोलिसात गुन्हे नोंद करण्याचे काम सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील समता नगर परिसरात जुन्या वादातून आज (दि. १०) सकाळी काही तरुणांसोबत मयत अरुण बळीराम सोनवणे (वय २८, रा. समता नगर जळगाव) याचा वाद झाला होता. दुपारी ३ वाजताच्या सुमारास मारेकऱ्यांनी अरुण सोनवणे याला समता नगरातील वंजारी टेकडी येथे बोलावले. त्यानंतर त्याठिकाणी अरुणवर चॉपर व कोयत्याने वार केले.  दरम्यान गळ्यावर, छातीवर, पाठीवर, मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने अरुणचा जागेवरच मृत्यू झाला.

लहान भाऊ टेकडीवर गेल्याची माहिती मिळाल्यानंतर मोठा भाऊ गोकुळ सोनवणे हा देखील तात्काळ तिथे गेला. यावेळी त्याला भाऊ अरुण याचा खून झाल्याचे निदर्शनास आले. तर सोबत असलेले आशिष संजय सोनवणे आणि गोकुळ बळीराम सोनवणे हे गंभीरित्या जखमी झाल्याचे आढळून आले. त्यानंतर जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. अरुण सोनवणे याला मयत घोषीत करण्यात आले. यावेळी जिल्हा शासकीय रुग्णालयात नातेवाईकांची व मित्रपरिवाराची प्रचंड मोठी गर्दी पाहायला मिळाली.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर समतानगर आणि जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल होत चौकशीला सुरुवात केली.  रामानंदनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.

Back to top button