

जळगाव : नरेंद्र पाटील
जळगाव जिल्ह्यातील शेतकरीवर्गाचा जीवनयात्रा संपविण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. 2025 च्या पहिल्या तीन महिन्यांतच तब्बल 66 शेतकऱ्यांनी जीवन संपविले असून, या घटनांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या प्रकरणांपैकी 16 प्रकरणे पात्र, 24 अपात्र, तर 26 प्रकरणे अद्यापही प्रलंबित आहेत.
2025 मध्ये सर्वाधिक जीवनयात्रा संपविण्याच्या घटना या मार्च महिन्यात झाल्या असून या महिन्यात 26 शेतकऱ्यांनी आयुष्य संपवले आहे. जानेवारीत 17 तर फेब्रुवारीत 13 शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविल्याची नोंद आहे. विशेष बाब म्हणजे मार्च महिन्यातील 23 प्रकरणे अजूनही प्रलंबित आहेत.
2024 सालातही जिल्ह्यात 168 शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविल्या होत्या. यापैकी 96 प्रकरणे पात्र, तर 72 अपात्र ठरली होती. सर्वाधिक जीवनयात्रा संपविण्याच्या घटना डिसेंबर (21), फेब्रुवारी (18), आणि एप्रिल (18) या महिन्यांत नोंदविण्यात आल्या आहेत.
जळगाव जिल्हा केळी आणि कापसाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातून देशभर तसेच विदेशातही केळी निर्यात केली जाते. मात्र, शेतीमधील आर्थिक अडचणी, नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे शेतकऱ्यांवरील ताण सतत वाढत असून, जीवनयात्रा संपविण्याचे प्रमाण कमी होताना दिसत नाही.
2024 नंतर 2025 च्या सुरुवातीच्या तीन महिन्यांतच 66 जीवनयात्रा संपविण्याचा आकडा हा जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा असल्याचा इशारा दर्शवित आहे. विशेषतः मार्च महिन्यातील आकडेवारी धक्कादायक असून, शासन आणि प्रशासनाने तातडीने लक्ष देणे आवश्यक झाले आहे.