

धुळे : आर्मीत नोकरीचे स्वप्न भंगल्याने धुळे तालुक्यातील रामी येथील उच्चशिक्षित तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवले. या घटनेची माहिती मिळाल्याने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी त्या तरुणाच्या परिवाराला भेट देऊन त्यांची व्यथा जाणून घेतली. यावेळी शेतकरी बापाने त्याची मांडलेली व्यथा ऐकून पोलीस अधीक्षक धिवरे यांना अश्रू अनावर झाले. तरुणांनी व पालकांनी सुसंवाद साधून तणाव मुक्त राहण्याचे पोलिस अधीक्षक धिवरे यांचे आवाहन केले.
धुळे तालुक्यातील रामी येथे अक्षय यशवंत माळी (वय 21) या तरुणाने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. अक्षय याने बीएससी पर्यंत शिक्षण घेतले होते. गेल्या काही वर्षांपासून तो सैन्य दलात दाखल होण्यासाठी प्रयत्न करीत होता. त्याच्या काही सहकाऱ्यांना यात यश देखील आले होते. मात्र प्रत्येक वेळेस एक ते दोन गुणांनी अक्षय हा मागे पडत होता. त्यामुळे देशसेवेचे त्याचे स्वप्न पूर्ण होत नव्हते. त्यातच त्याने गळफास लावून स्वतःला संपवून घेतले.ही माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी थेट माळी परिवाराची भेट घेतली.
कोणत्याही क्षेत्रात अपयशाने खचून जाणे हे योग्य नाही. तर पुन्हा प्रयत्न करून आपली स्वप्न पूर्ण केली पाहिजेत. अशा पद्धतीने जीवन संपवल्याने परिवार हा एकाकी पडतो. त्यामुळे नैराश्य येत असल्यास आपल्या मित्र किंवा परिवार यांच्यासमोर व्यक्त झाले पाहिजे. परिवारात देखील घरातील मुलांशी सतत संवाद ठेवणे अत्यंत आवश्यक आहे . त्यांच्या मनात काय चालू आहे, हे शोधायलाच हवे . त्यांना बोलते करायलाच हवे. असे मत देखील यावेळी धिवरे यांनी व्यक्त केले.