

धुळे : “वाहतूक सुरळीत करण्यासाठी मी जर मंदिरांसह प्रार्थनास्थळांचे अतिक्रमण हटवतो म्हणून अफजल खान ठरत असेन, तर देशभरात ४४६ मंदिरे, ११०० घरे व २३०० दुकाने पाडणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी चंगेज खान ठरणार का?” असा रोखठोक सवाल माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
धुळे शहरातील भंगार बाजार परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धकृती पुतळ्याशेजारी पूर्णाकृती पुतळ्यासाठी चबुतऱ्याचे काम सुरू आहे. या कामात कायदेशीर प्रक्रिया न पाळल्याचा आरोप करीत गोटेंनी न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यानंतर आमदार अनुप अग्रवाल यांच्या समर्थकांनी विविध आरोप केले असून, त्यावर गोटे यांनी पत्रकार परिषदेत खुलासा दिला.
गोटे म्हणाले, “धुळे शहरात हिंदुत्वाच्या नावाखाली एक नवी 'हायब्रीड' जमात उदयास आली आहे. ही जमात धर्माच्या अफूच्या नशेत अंधभक्तांना भडकावून स्वतःचे काळे धंदे चालवत आहे. हे हायब्रीड हिंदू कोणत्या पात्रतेचे आहेत, याबाबत मी एक सीडी माझ्या सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आहे.”
“भाजपच्या नेतृत्वाने मला अफजल खान म्हटले. पण, ११ वर्षात नरेंद्र मोदींनी वाराणसीतील २८६ मंदिरे, अहमदाबादमधील ८० मंदिरे, अयोध्येमधील ३० मंदिरे, २२०० दुकाने, ८०० घरे व वृंदावनमधील ५० मंदिरे पाडली. प्रभू श्रीकृष्णाच्या जन्मभूमीवरील मंदिरे सुद्धा उद्ध्वस्त केली. अशा कृत्यांना काय म्हणायचं? एक हजार अफजल खान गेले तरी एक चंगेज खान निर्माण होतो. मी जर अफजल खान असेन, तर मोदी चंगेज खान का नाही?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
गोटे यांनी स्पष्टच सांगितलं की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माझा विरोध नाही. परंतु, चबुतऱ्याच्या कामात कायद्याचे उल्लंघन झाले असल्यामुळे मी न्यायालयात दावा दाखल केला आहे. मी आजवर कधीही स्वार्थासाठी कारवाई केली नाही आणि भविष्यातही करणार नाही.”
“सोशल मीडियावरून माझ्याविरोधात अपप्रचार करत, माझ्यावर जीवघेणा हल्ला घडवून आणण्याचा कट रचला जात आहे. या सर्व प्रकाराकडे धुळे पोलिस प्रशासन शांतपणे बघत बसले आहे. माझ्या जीवाचे बरेवाईट झाले, तर याला जबाबदार कोण?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.