

धुळे : मुंबईत वेव्हज् परिषद होत आहे. या परिषदेमुळे महाराष्ट्रात गुंतवणूक व रोजगार वाढण्यास मदत होणार असून भविष्यात ऑडिओ, व्हिज्युअलचे कॅपिटल महाराष्ट्र राहील. असा विश्वास राज्याचे पणन, राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमानंतर ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार आलं आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आता महाराष्ट्र थांबणार नाही, हे ब्रीद आम्ही दिलं होतं, त्याला अनुसरून आपल्याकडे ‘वेव्हज्’ ही आंतरराष्ट्रीयस्तराची कॉन्फरन्स आयोजनाची संधी महाराष्ट्राला मिळाली आहे. या परिषदेच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) पासून तर एंटरटेनमेंटपर्यंत, म्युझिकपासून तर डिजिटलपर्यंत जागतिक परिषदेचे यजमानपद महाराष्ट्राला मिळालं, हे आम्ही आमचं भाग्य समजतो. पुढच्या काळामध्ये जगातलं ऑडियो-व्हिज्युअल कॅपिटल जर ते कुठे असेल, तर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये राहणार आहे. त्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार असून या माध्यमातून महाराष्ट्रातल्या युवकांना रोजगाराची संधी मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
महाराष्ट्र दिनी वेव्हज् परिषद कार्यक्रमाची सुरुवात मुंबईमध्ये होते. ही परिषद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून जगातल्या अनेक देशांचे प्रतिनिधी, उच्चस्तरीय अधिकारी, प्रतिनिधी, जगातल्या विविध कंपन्यांचे प्रतिनिधी मुंबईत दाखल झाले आहेत. ही परिषद आजपासून चार दिवस चालणार आहे. या परिषदेच्या माध्यमातून पुढच्या 10-20 वर्षांमध्ये ऑडियो-व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट हे कुठल्या दिशेने जाणार आहे, काय वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स या क्षेत्रात येणार आहेत याची चर्चा आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होणार आहे. आज महाराष्ट्र दिन आहे आणि त्या दिनानिमित्त ही सुरुवात होते आहे. याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे त्यांनी अभिनंदन केले.