धुळे : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर; आजपासून आदर्श आचारसंहिता लागू

धुळे : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर; आजपासून आदर्श आचारसंहिता लागू

धुळे; पुढारी वृत्तसेवा : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. 02-धुळे लोकसभा मतदारसंघासाठी 20 मे, 2024 रोजी मतदान तर 4 जून, 2024 रोजी मतमोजणी होणार असून आजपासून धुळे जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या संदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांच्यासह प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी गोयल म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा निवडणूक कार्यक्रम घोषीत केला आहे. देशभरात सात टप्प्यात निवडणूक होणार असून या कार्यक्रमानुसार 02-धुळे लोकसभा मतदारसंघात पाचव्या टप्यात संपुर्ण निवडणूक प्रक्रिया होणार आहे. धुळे लोकसभा मतदार संघासाठी निवडणुकीची अधिसूचना 26 एप्रिल, 2024 रोजी प्रसिद्ध होईल. उमेदवारांना नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक 3 मे, 2024 असा आहे. नामनिर्देशनपत्राची छाननी करण्याचा दिनांक 4 मे, 2024 असा असुन उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक 6 मे, 2024 आहे. तर या निवडणूकीसाठी 20 मे, 2024 रोजी मतदान होईल तर 4 जून, 2024 मतमोजणी होईल. धुळे लोकसभा मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील धुळे ग्रामीण, धुळे शहर, शिंदखेडा तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व बागलाण असे 6 विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे.

धुळे जिल्ह्यात 17 हजार 321 इतक्या 18 ते 23 वयोगटातील नवीन मतदारांची नोंद झाली आहेत. तर 85 वर्षावरील वयोगटातील मतदारांची संख्या 23 हजार इतकी आहे. जिल्ह्यात 10 हजार 900 इतके मतदार हे दिव्यांग असून आवश्यकतेनुसार त्यांच्यासाठी पोस्टल बॅलेटची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. तसेच मतदान केंद्रावर त्यांच्या सोईसाठी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. जिल्ह्यात 1 हजार 704 मतदान केंद्र राहणार असून 54 मतदान केंद्र हे क्रिटीकल आहेत. त्याठिकाणी वेबकॉस्टिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आयोगाच्या सूचनानुसार 50 टक्के मतदान केंद्रावर वेबकॉस्टिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सेक्टर अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबरच बैठे व फिरते पथक कार्यान्वित करण्यात येत आहे. धुळे जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघातील 17 लाख 27 हजार 476 मतदार मतदानांचा हक्क बजावणार आहे. तर 02-धुळे लोकसभा मतदारसंघात धुळे ग्रामीण 3 लाख 87 हजार 955 , धुळे शहर 3 लाख 34 हजार 510, शिंदखेडा 3 लाख 27 हजार 255, मालेगाव मध्य 2 लाख 96 हजार 2, मालेगाव बाह्य 3 लाख 53 हजार 670 तसेच बागलाण 2 लाख 84 हजार 331 असे एकूण 19 लाख 83 हजार 723 मतदारांची संख्या आहे.

जिल्ह्यात आजपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितचे अनुषंगाने शासकीय जागेवरील बॅनर, पोस्टर काढण्यात येवून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यावर्षी मतदानांची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीपद्वारे मोठया प्रमाणात जिल्हाभरात विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत आहे. मागील निवडणुकीत ज्याठिकाणी कमी मतदान झाले होते, अशा ठिकाणी मेळावे, कार्यक्रम, पथनाट्य, शाळा व कॉलेज मध्ये जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी नागरिकांनी भयमुक्त वातावरणात मतदान करावे, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस विभागाने आखलेल्या बंदोबस्त आराखडा व केलेल्या नियोजनाची माहिती दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news