

पिंपळनेर,जि.धुळे : गेल्या पाच ते सहा वर्षापासून प्रलंबित असलेला पिंपळनेर शहरातील बस स्थानक ते जे. टी. पॉईट या रस्त्याच्या कामाचा मुहुर्त मिळाला असून साक्रीच्या आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते वादातीत रस्त्याचे काम अखेर मार्गी लागले आहे. कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी डॉ.तुळशीराम गावित उपस्थित होते.
कार्यक्रमाप्रसंगी आमदार मंजुळा गावित यांनी सांगितले की, मागील 5 वर्षाच्या आमदारकीच्या कालावधीत साक्री तालुक्याच्या विकास कामांबरोबरच पिंपळनेर गावातून जाणाऱ्या बसस्थानक ते जे .टी. पॉइंट या अत्यंत खराब झालेल्या रस्त्यांचा कामाचा बिकट प्रश्न शासनाकडे सातत्याने लावून धरला. या रस्त्याच्या दयनीय परिस्थितीमुळे धुळे जिल्हाधिकारी, सा. बां. विभागाचे अधिक्षक अभियंता, रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी यांचेसह तत्कालीन व आत्ताचे मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे लेखी पत्राव्दारे हा विषयाबाबत पाठपुरावा घेण्यात आला. गेल्या पाच वर्षापासून प्रलंबीत असलेल्या या रस्त्याचे काम सुरु व्हावे यासाठी पिंपळनेर शहरातील प्रतिष्ठीत नागरीकांचे, व्यापारी बांधवांचे तसेच रस्ता कामात ज्यांचा अडथळा येत होता, त्यांचेसह अनेक वेळा जिल्हाधिका-यांची भेट घेवुन रस्त्याचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून प्रयत्न करण्यात आला.
परंतु काहींनी रस्त्याच्या कामाचे क्रेडीट मिळु नये म्हणुन, प्रयत्न करुन विविध अडथळे निर्माण केले. रस्त्याचा प्रश्न न्यायालयात प्रलंबीत आहे. इतर खोटे कागदपत्रे अधिका-यांना पुरवुन त्यांची दिशाभूल केली जात आहे, असे होऊ नये म्हणून सातत्याने पाठपुरावा घेण्यात आला. रस्त्यावरील प्रचंड वाहतुकीमुळे लहान-माठे अपघात घडले आहेत. रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत असे. त्याचप्रमाणे रस्त्याचे काम सुरु होत नाही तोच अडथळे आणणे, काम बंद करण्यासाठी प्रयत्न करणे असे प्रकार घडत होते.
रस्त्याचे काम व्हावे म्हणून दि.24 जुन 2024 रोजी धुळे जिल्हाधिकारी यांच्या दालनात उपोषणाचा मार्ग स्विकारण्यात आला. मात्र जिल्हाधिका-यांच्या विनंतीवरुन उपोषण मागे घेण्यात आले. रस्ता प्रश्न मार्गी लावण्याचा निर्धार करुन केंद्रिय भू-प्रुष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास येथील वस्तुस्थिती आणून दिली. त्यांच्या आदेशाने लगेचच सर्व यंत्रणा जागी झालो. त्यानंतर वादातीत रस्त्याची मोजणी पोलीस बंदोबस्तात करण्यात आली.
महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी यांनी तातडीने सुत्र हालवून रस्त्याच्या कामासाठी 21 कोटी 20 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करुन कामाची वर्क ऑर्डर दि. 21 मार्च रोजी प्रसिध्द करत सोमवार (दि.3) रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित यांचे अध्यक्षतेखाली रस्ता कामास सुरुवात करण्यात आल्याने आनंद वाटत आहे.
कार्यक्रम प्रसंगी अपर तहसिलदार दत्तात्रय शेजुळ, तालुका प्रमुख पंकज मराठे, अमोल सोनवणे, धनराज जैन, पांडुरंग सुर्यवंशी, जि.प.सदस्य गोकुळ परदेशी, संभाजी अहिरराय,संदीप देवरे, सागर गावित, विशाल देसले, शामसेठ कोठावदे, जितेंद्र बिरारी, बाळा शिंदे, डॉ.पंकज चोरडिया, प्रशांत चौधरी, सविता पगारे, बाबा पेंढारकर, रामचंद्र भामरे, अविनाश पाटील, प्रताप पाटील, भालचंद्र ततार, रविंद्र सुर्यवंशी यांचेसह शिवसेना पदाधिकारी,भाजप पदाधिकारी पिंपळनेर परिसरातील व सटाणा रोडवरील रहिवासी मोठया संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. ज्ञानेश्वर ऐखंडे यांनी केले. नितीन नगरकर यांनी सुत्रसंचलन केले. संभाजी अहिरराव यांनी आभार मानले.