

Dhule News
धुळे : सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेतून धुळे तालुक्यातील सत्तावीस गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव तापी पाणी पुरवठा विभागीय महामंडळ स्तरावर मंजूर झाला आहे. त्यामुळे धुळे तालुक्यातील दुष्काळी आणि पाणीटंचाईग्रस्त गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच सुटणार आहे.
याबाबत आमदार राम भदाणे यांनी सांगितले की, धुळे तालुक्यासाठी सुलवाडे-जामफळ-कनोली योजना महत्त्वाकांक्षी ठरणार आहे. या योजनेमुळे दुष्काळ हटणार असून टंचाईग्रस्त गावांचा प्रश्न सुटणार आहे. पहिल्या टप्प्यात धुळे तालुक्यातील सोनगीर, दापुरा, सरवड, कापडणे, देवभाणे, धमाणे, नगाव, बिलाडी, वडेल, निकुंभे, मेहेरगाव, निमडाळे व सडगाव या तेरा गावांसाठीचा पाणी आरक्षणाचा प्रस्ताव तापी पाटबंधारे विकास महामंडळ स्तरावर मंजूर झाला आहे. यामुळे या गावांचा पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे.
उर्वरित चौदा गावांच्या प्रस्तावाला लवकरच मंजुरी
आमदार राम भदाणे यांनी या संदर्भात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती दिली आहे. सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेतून धनूर, सायने, ढंढाणे, तिसगाव, गोंदूर, बोरीस, नंदाणे, नवलाणे, आर्वी, अनकवाडी, सोनेवाडी, बोरविहीर, हडसुणे व विसरणे या चौदा वाढीव गावांनाही योजनेतून पिण्याचे पाणी देण्याबाबतचा प्रस्ताव जलसंपदा व लाभक्षेत्र विकास विभागाकडे (तापी खोरे विकास महामंडळ) दिला आहे. तोदेखील लवकरच मंजूर होऊन त्याचे आदेश पारित होणार आहेत.
लोकसंख्येनुसार पाणीसाठ्यासह प्रस्ताव
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने सदर वाढीव गावांना लोकसंख्येनुसार आवश्यक पाणीसाठ्यासह पाणी आरक्षणाचा प्रस्ताव विहित नमुन्यात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय, जलसंपदा विभाग आणि लघुपाटबंधारे विभाग यांच्याकडून याला मंजुरी मिळणार आहे, असे आमदार राम भदाणे यांनी सांगितले.
या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या गावांना मोठा दिलासा मिळणार आहे. उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागणाऱ्या गावांना आता बारमाही पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे.