

Dhule Court Verdict
धुळे: दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही, यासाठी नराधम मुलाने आईची हत्या केल्याचा गुन्हा धुळ्याच्या सत्र न्यायालयात सिद्ध झाला आहे. या नराधम मुलाला जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली. साक्री तालुक्यातील आंबापाडा येथे ही घटना घडली होती. या संदर्भात खूनाचा गुन्हा पिंपळनेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.
साक्री तालुक्यातील कुडाशी नजीक असलेल्या आंबापाडा येथे ही घटना घडली होती. या गावात राहणारा गुलाब बंडू बागुल हा सुमनबाई बंडू बागुल यांचा नात्याने मुलगा असून त्यास दारू पिण्याचे व्यसन होते. दिनांक 30 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी 7 वाजेचे पूर्वी आंबापाडा गावी मृत हिचे राहते घरी आरोपी याने सुमनबाई हिच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. तिने नकार दिल्याने या गोष्टीचा राग आल्याने गुलाब बंडू बागुल याने सुमनबाई बंडू बागुल हिला मारहाण करून तिचे डोके भिंतीवर व जमिनीवर आपटले.
या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने सुमनबाई यांचा मृत्यू झाला. या संदर्भात पिंपळनेर पोलीस ठाण्यात चुनीलाल तानाजी बागुल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या गुन्ह्याचे कामकाज धुळ्याच्या सत्र न्यायालयात चालवण्यात आले.
यात सरकारी अभियोक्ता पराग पाटील यांनी महत्त्वाचे साक्षीदार आणि पुरावे न्यायालयात सादर केल्याने आरोपी गुलाब बंडू बागुल याला खूनाच्या आरोपाखाली दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.