

पिंपळनेर, जि.धुळे : साक्री तालुक्यातील आमळी येथील प्रसिद्ध श्री कन्हैयालाल महाराज यांच्या कार्तिकी एकादशीपासून प्रारंभ होणाऱ्या वार्षिक यात्रोत्सवासाठी तब्बल चार लाखांहून अधिक भाविक नतमस्तक झाले. पहाटे चारपासून मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
त्यानंतर दुपारी गर्दीने उच्चांक गाठला. रात्री उशिरापर्यंत गर्दी कायम होती. टाळ-मृदंगाचा गजर व महाराजांच्या कन्हैयालाल जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. बहुतांश भाविकांनी या वेळी नवसपूर्ती केली. दरम्यान, कार्तिकी एकादशीनिमित्त सकाळी सहाला ट्रस्टी किरण दहिते, पत्नी सविता दहिते यांच्या हस्ते महापूजा व महाआरती करण्यात आली. मंदिर आणि परिसरात सर्वत्र रोषणाई करण्यात आली. ट्रस्टतर्फे भाविकांसाठी दर्शन बारीची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. भाविकांना मूलभूत सोयीसुविधांबरोबरच महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले होते. सकाळी महाराजांच्या पादुकांचे विधिवत पूजन करून पारंपरिक वाद्यांच्या निनादात पालखी मिरवणूक मंदिर, यात्रोत्सव परिसर व आमळी गावातून निघाली. यावेळी मोठ्या प्रमाणावर दर्शन घेत भाविकांनी सहभाग घेतला.
गुजरात, मध्यप्रदेशसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून आमळीत भाविक दाखल झाले होते. आमळीकडे येणाऱ्या सर्व रस्ते वाहने व पदयात्रेकरूंच्या गर्दीने गजबजून गेले होते.
व्यावसायिक गेल्या दहा दिवसांपासून दाखल झाले आहेत. खरेदीसाठी दुकानांवर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत होती. यात्रोत्सव परिसरात चैतन्याचे वातावरण पसरले आहे. सर्वच क्षेत्रातील खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला. गर्दीमुळे विक्रमी उलाढाल होत असल्याने व्यावसायिक, व्यापारीवर्गात समाधानाचे वातावरण आहे.
यात्रोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्वत्र 24 तास पोलिस बंदोबस्त असून, पोलिस अधिकारी,वैद्यकीय पथक,वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी तळ ठोकून आहेत.आमळी कडे येणाऱ्या सर्वच रस्त्यांवरील प्रचंड गर्दीमुळे वाहन पार्किंगच्या समस्येला व वाहतूक कोंडीला भाविकांना दिवसभर सामोरे जावे लागले.
यात्रोत्सवात दिवसभरात नऊ ट्रक केळी, दोन ट्रक अननस, पाच ट्रक नारळ विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
जिजाबाई दहीते,कलाबाई दहीते,सुमनबाई पाटील यांच्या हस्ते विधीवत पूजा करून छत्रीचे अनावरण करण्यात आले.
उत्तर महाराष्ट्रासह गुजरातमधील भाविकांकडून गेल्या दोन वर्षांत आलेल्या दान स्वरुपातील चांदी, सोन्यातून सुरत येथील राधाकृष्ण ज्वेलर्सचे संचालक केतनभाई एम सोनी यांच्याकडून तयार करण्यात आली. त्यासाठी एकवीस किलो चांदी, दहा तोळे सोने, दहा हजार अमेरिकन डायमंड,माणिक मोती,तीनशे लहान मोर,मोरपंख आदींचे नक्षीकाम करण्यात आले आहे. तर छत्री तयार करण्यासाठी दहा कुशल कारागिरांना आठ महिने लागले असून,सर्व कामे हाताने केली आहेत. छत्री तयार करण्याची दहा लाख रुपये मजुरी, तर एकूण 42 लाख 51 हजार रुपये खर्च आला असल्याचे ट्रस्टी किरण दहिते, कन्हय्यालाल दहिते, नरेंद्र दहिते,माधवराव दहिते, दत्तात्रय दहिते आदींनी सांगितले.
यात्रोत्सवातील मिठाईचे दर (किलोत)
पेढे-400, नॉयलॉन गोडशेव-200, जिलेबी-200, मैसूरपाक-260,बर्फी-160, बालूशाही-160,शेव-200, पापडी-240,खजूर-120 रुपये दर असल्याचे नंदुरबार येथील जय खानदेश हॉटेलचे संचालक हारून हलवाई, फिरोज रशीद हलवाई, सादिकभाई हलवाई यांनी ही माहिती दिली.